मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
मालेगाव मंडळातील ग्रामीण भागातील कृषी वीज ग्राहकांना अखंडित, सुरळीज वीजपुरवठा मिळावा म्हणून कृषी आकस्मिक निधी योजनेतून कुकाणे व परिसरातील गावांना कमी वीज दाब व वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या दूर होऊन नवीन वीज उपकेंद्राच्या माध्यमातून गावांना 24 तास अखंडीत, व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे, असे आ.दादा भुसे यांनी केले.
राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत आकस्मिक एसीएफ निधी योजना कुकाणे येथील नवीन 33/11 के.व्ही. वीज उपकेंद्राचे उद्घाटन आमदार दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते या कार्यक्रमाला नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता जगदीश इंगळे, शहरी व ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीव बोरकर, उप कार्यकारी अभियंता वाघ यांच्यासह वीज मंडळाचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
कृषी आकस्मिक निधी योजनेअंतर्गत कुकाणे उपकेंद्रासाठी रुपये 2.40 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती देत आमदार भुसे पुढे म्हणाले यामध्ये नवीन उपकेंद्र उभारणी व त्यासाठी लागणार्या 33/11 के व्ही उच्चदाब वाहिनी उभारण्याची कामे अंतर्भूत आहेत. या योजनेंतर्गत नवीन 5 एमव्हीए क्षमतेचे 33/11 केव्ही कुकाणे उपकेंद्राचे काम पूर्ण झाले व आज या कुकाणे उपकेंद्राचे लोकार्पण होत आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून कुकाणे, करंजगव्हाण, वजिरखेडे, दहिदी व लेंडाणे या गावांना लाभ होणार असल्याचे आमदार भुसे यांनी यावेळी सांगितले.
शेतकर्यांना चोवीस तास वीज पुरवठा होण्यासाठी उपलब्ध जागेत सोलर प्लांटचा प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना संबंधित अधिकार्यांना यावेळी आमदार भुसे यांनी दिल्या. कुकाणे वीज उपकेंद्राच्या माध्यमातून 33/11 केव्ही टिंगरी या अतिभारीत उपकेंद्राचा वीज भार कमी होईल.
तसेच 33/11 केव्ही कुकाणे उपकेंद्रामधून निघणार्या 11 के.व्ही. मुंगसेवाडी एजी वाहिनी, 11 केव्ही कुकाणे गावठाण वाहिनी व 11 केव्ही विरोबा एजी वाहिनी या नवीन वाहिन्या आहेत. त्यानुसार 11 केव्ही मुंगसेवाडी एजी वाहिनी मुळे 33/11 केव्ही टिंगरी उपकेंद्रातून निघणारी 11 केव्ही दहीदी वाहिनीवरील विद्युतभार कमी होईल आणि या वाहिनीवरील मुंगसेवाडी, पिंजारवाडी, लेडाणे शिवार आणि लोंढेवस्ती त्याचप्रमाणे 11 केव्ही विरोबा एजी वाहिनी मुळे कुकाणे शिवार, विरोबावस्ती आणि वजीरखेडे शिवारातील कृषी पंपधारक ग्राहकांच्या समस्या दूर होतील आणि अखंडित वीज पुरवठा होईल.
तसेच 11 केव्ही कुकाणे गावठाण वाहिनीमुळे कुकाणे गावाला 24 तास अखंडित वीज पुरवठा होईल. जुन्या 11 केव्ही वाहिन्यांचे विभाजन झाल्यामुळे परिसरातील कुकाणे, करजगव्हाण, लेंडाणे, दहीदी तसेच लगतच्या इतर गाव व त्यातील शिवारांना अखंडित वीज पुरवठा होणार असल्याचेही आमदार भुसे यांनी शेवटी बोलतांना सांगितले.