Monday, June 17, 2024
Homeनाशिकनाशकात आयकर विभागाची मोठी कारवाई; ३० तास धाड अन् सापडले २६ कोटींचे...

नाशकात आयकर विभागाची मोठी कारवाई; ३० तास धाड अन् सापडले २६ कोटींचे घबाड

जप्त केलेली रक्कम नेण्यासाठी बोलवल्या सात कार

नाशिक | Nashik

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून आयकर विभाग (Income Tax Department) कर बुडविणाऱ्यांविरोधात चांगलाच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच आयकर विभागाने नांदेडमध्ये छापेमारी करत कोट्यवधींचे घबाड जप्त केले होते. त्यानंतर आता नाशिकमध्ये (Nashik) देखील आयकर विभागाकडून अशीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाशकातील एका सराफ व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली असून या छापेमारीत तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सराफ व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाची ही कारवाई सलग ३० तास चालली असून या कारवाईसाठी नाशिक, नागपूर आणि जळगावचे अधिकारी एकत्र आले होते. तसेच ज्यावेळी आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी केली त्यावेळी या सराफ व्यावसायिकाच्या एका खोलीत पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचा खच आढळून आला. ही रक्कम इतकी मोठी होती की, रक्कम मोजण्यासाठी या अधिकाऱ्यांना तब्बल १४ तास लागले. यानंतर जप्त केलेली रक्कम नेण्यासाठी आयकर विभागाला एकूण सात कार बोलवाव्या लागल्या. या कारवाईत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण २६ कोटींची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले.

दरम्यान, ५० ते ५५ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून आयकर विभागाच्या या पथकाने या सराफ व्यावसायिकाच्या शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासले आहेत. याशिवाय मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली. तसेच नाशिक शहरातील एका सराफ व्यावसायिकाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता (Intangible Assets) सापडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या