Monday, July 15, 2024
Homeनगर10 ऑक्सिजन बेड वाढवा; शिंगणापूरचे कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करा

10 ऑक्सिजन बेड वाढवा; शिंगणापूरचे कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करा

नेवासा (तालुका वार्ताहर) –

- Advertisement -

करोना संदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांनी गुरुवारी नेवासा पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली. बैठकीत नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालयातील 20 ऑक्सिजन बेड वाढवून ते 30 करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत त्यांनी अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे मी निधीची तरतूद करतो अशी ग्वाही त्यांनी दिली.तालुक्यातील कोव्हिड सेंटरसाठी दोन रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीवरून बोलताना केली. नेवासा तालुक्यात शनिशिंगणापूर येथे या आधी कोव्हिड सेंटर होते ते पुन्हा सुरू करण्याच्यादृष्टीने पावले उचलावीत अशा सूचना देखील खासदार लोखंडे यांनी अधिकार्‍यांशी बोलताना केल्या. ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन कमी पडणार नाही त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही दिली.

बैठकीच्या प्रसंगी परिविक्षाधीन प्रांताधिकारी गणेश पवार, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहसीन बागवान, भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, शिवसेना शहर प्रमुख नितीन जगताप, युवा सेनेचे निरज नांगरे, यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

खासदार लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न

नेवाशात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कोव्हिड आढावा बैठकीत वंचीत आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने भर सभेत गोंधळ उडाला. करोना संकटात ठोस उपाययोजना नसल्याच्या कारणावरून शाई फेकण्याचा प्रकार घडला. बैठकीत हा गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखत उपस्थित पोलिसांनी सुखदान यांना सभागृहाबाहेर घेतले. काही वेळा नंतर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठकीमध्ये बोलावून सुखदान यांचे म्हणणे खासदार यांनी ऐकून घेतले खासदार यांना तालुक्यातील अपुरी प्रशासकीय यंत्रणा आणि चालू असलेल्या कारभाराबद्दल सविस्तर माहिती सुखदान यांनी दिली. काही वेळानंतर सुखदान तेथून निघून गेले यानंतर खासदार यांनी तालुका आढावा बैठक घेऊन विविध विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत सविस्तर चर्चा केली व पत्रकार परिषद घेऊन खासदार यांनी संबंधित विषयावर पडदा टाकला .

- Advertisment -

ताज्या बातम्या