नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला असून त्यामुळे टँकरची मागणीतही हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कुठल्याही तालुक्यात विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या नाहीत. वाढत्या मागणीनुसार टँकरची संख्या वाढेल, तशी गरजेनुसार विहिरींच्या अधिग्रहणाची तरतूद असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात 29 टँकरद्वारे शहर जिल्ह्यात 25 गावे आणि नऊ वाड्यांसह 34 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.सर्वाधिक येवला तालुक्यात 15 टँकर सुरू आहेत.
जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई झळ जाणवू लागली असून, टँकरला मागणी सुरू झाली आहे. जिल्हाभरातील सुमारे 36 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. येवला, चांदवड आणि बागलाण अशा तीन तालुक्यांत टँकरची मागणी वाढली आहे.
शहर व जिल्ह्यात 25 गावे आणि 9 वाड्यांसह 34 ठिकाणी पाण्याच्या टँकरची मागणी सुरू झाली आहे. साधारण 36,374 लोकसंख्येला 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक 15 टँकर येवला तालुक्यात सुरू आहेत. 19 गावे व सात वाड्यांवर सात शासकीय व सहा खासगी अशा 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. रोज साधारण 15 टँकरच्या फेर्यांतून हा पाणीपुरवठा केला जात आहे.
चांदवड तालुक्यात पाण्याच्या टँकरची मागणी आहे.पाच गावे आणि एक वाडी अशा सहा ठिकाणी तीन शासकीय टँकरद्वारे 11 हजार दहा लोकसंख्येला 12 टँकरच्या फेर्या सुरू आहेत. बागलाण तालुक्यात एक गाव आणि एका वाडीवरील एक हजार 186 लोकसंख्येला दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.