Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधवाढवू भाषेचा गौरव

वाढवू भाषेचा गौरव

पेन्सिलला टोक केल्याने ती अधिक ठळक आणि स्पष्ट लिहिते. याच धर्तीवर बोलायचे तर विचार करतो तेव्हा मेंदू अधिक अचूकपणे काम करु लागतो. मराठी भाषेतल्या साहित्याच्या प्रत्येक अंगांमध्ये मेंदूला विचार करण्यास भाग पाडण्याची ताकद आहे म्हणूनच एकत्र येऊन मराठी भाषा दिन आनंदाने साजरा करणे आणि तिचा गौरव अनंत काळ टिकेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.

मराठी राजभाषा दिन साजरा करताना प्रत्येक मराठी मनात भाषेप्रतीचे प्रेम, अभिमान उचंबळून येणे स्वाभाविक आहे. यंदा आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जोरदार चळवळ सुरू असून गेल्या अनेक वर्षांची मराठी जनांची ही मागणी आता पूर्ण व्हायलाच हवी. या चळवळीत अनेकांचा वाटा आहे. त्यात माझ्या आईचा, साहित्यिक विजया वाड यांचाही खारीचा वाटा आहे. विश्वकोशाची अध्यक्ष असल्यापासूनच आईने ही मागणी लावून धरली. मी त्याची साक्षीदार आहे. 15 लाख लोकांपर्यंत आणि 105 देशांपर्यंत पोहोचला तेव्हा विश्वकोश ई-बुकमध्ये करण्याचा संकल्प सुफळ झाला. आत्तापर्यंत मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधानांकडे लाखो पत्रे गेली आहेत. एकीकडे हे काम सुरू असताना या भाषा दिनी ट्रस्टच्या माध्यमातून आपण अडीच हजार गरीब मुलांना मराठी पुस्तके वाटत आहोत. आपण शंभर लेखकांची पुस्तके काढली आणि ती मोफत वाटली याचे कारणच असे की भाषेची गोडी वाढली पाहिजे आणि ती अभिरुची संपन्न झाली पाहिजे. आपल्याकडे सकस साहित्य उपलब्ध आहे. पण त्याची गोडीच वाटली नाही, वाचायची सवयच राहिली नाही तर कशाचाच उपयोग नाही.

आजच्या डिजिटल युगामध्ये हातातल्या स्मार्टफोनमध्ये सगळे विश्व केंद्रित झाले आहे. त्यात साहित्यही नव्या रुपात सामावलेले आहे. पण ते उघडून वाचण्यासाठी मनात उत्सुकता निर्माण होणे गरजेचे आहे. अर्थातच त्यासाठी याप्रती जागृती निर्माण करावी लागणार आणि त्यासाठी अर्थसाह्य लागणार. त्यासाठीच आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर केंद्राकडून ती सवलत मिळेल. आज देशात साधारणत: 450 विद्यापीठे आणि 1200 ग्रंथालये आहेत. या सगळ्यांमध्ये मराठी साहित्य वेगवेगळ्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यासाठी, त्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करुन, साहित्य वेगवेगळ्या माध्यमातून समोर आणणे, त्याची माहिती देणे यासाठी अर्थसाह्याची नितांत आवश्यकता आहे. एखादी गोष्ट केवळ बोलली गेली तर वार्‍यावर विरुन जाते. म्हणूनच लोकगंगेपर्यंत पोहोचायचे झाले तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. विवेकसिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी बाराव्या-तेराव्या शतकातली आहे. त्यापूर्वीही हीच भाषा महारट्टी, मर्हाटी, मराहट्टी, महाराष्ट्री आदी नावाने वापरात होती. म्हणजेच ती अत्यंत प्राचीन आहे. यासंबंधीचे अनेक पुरावे आपण दिले आहेत. त्यामुळेच आता आपल्या भाषेला हा गौरव प्राप्त होणे गरजेचे आहे.

- Advertisement -

आपल्याकडे सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे. तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आदी भाषा अभिजात म्हणून मान्य झालेल्या आहेत. 22 भाषांना राष्ट्रीय भाषांचा दर्जा दिला गेला आहे. आज जगभरात जवळपास 11 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. खरे पाहता इतके उत्खनन करुन भाषा दीड हजार वर्षांपूर्वीची की अडीच हजार वर्षांपूर्वीची, या वादात पडण्यापेक्षा ती पुढची अडीच हजार वर्षें कशी टिकेल याचा विचार करणे मला अधिक गरजेचे वाटते. त्यासाठीच प्रत्येक मराठी माणसाने या भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचा आग्रह धरायला हवा.

मुलांना आपल्या भाषेची गोडी वाटली पाहिजे. आपण मातृभाषेची गोडी अशीच विसरुन गेलो तर कालांतराने आई-वडिलांचे, देशाचे प्रेमही आपण विसरुन जाऊ. खरे तर आपल्या संस्कृतीची पाळमुळे घट्ट रुजवण्यासाठी या गोष्टी मूलभूत आहेत. ती जगण्याची अविभाज्य अंगे आहेत. एखादी व्यक्ती ठराविक पद्धतीने विचार का करते यामागे काही मूळं असतात आणि त्या मुळांवर त्या व्यक्तीच्या मानसिक जडणघडणीचा पगडा असतो. या सगळ्याच्या कक्षा तुमच्या भाषेच्या साहित्यिक मूल्यांवर अवलंबून असतात. घरोघरीचे वातावरण भाषेच्या आधारे घडत असते आणि ते घडण्यामध्ये वाचनाचे मोलाचे योगदान असते.

आपल्याकडे विपुल साहित्य उपलब्ध आहे. त्याचा दर्जा डोळे दिपवून टाकणारा आहे. ते जगासमोर आले तर माणसे हरखून जातील यात शंका नाही. मी ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ नावाचा एक कार्यक्रम करायचे. हा एक दर्जेदार कार्यक्रम, याचा नामोल्लेख करते. कारण यात सहभाग घेणारी माणसे खरेच आपल्या देशाचे भूषण आहेत. डॉ. नारळीकर सर, काकोडकर सर, डॉ. माशेलकर सर, मेधा पाटकर, उज्ज्वल निकम, विजय कुवळेकर अशी किती नावे घेऊ? वेगवेगळ्या प्रांतातली ही दिग्गज माणसे आज आपल्यामध्ये आहेत, ती कार्यरत आहेत. आजपासून 30 वर्षांनंतर आपण पुढच्या पिढीचा विचार करतो तेव्हा त्यांना या माणसांच्या योगदानाची माहिती असणे गरजेचे नाही का? यासाठीच समृद्ध माणसांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेले काम, आपल्या भाषेमध्ये केलेली साहित्यनिर्मिती आणि या भाषेत मांडलेले मोलाचे विचार जनसामान्यांपर्यंत, विशेषत: पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. यासाठीच राजभाषा दिनाला यथोचित स्थान आणि प्रसिद्धी मिळाली पाहिजे.

भाषा आपल्याला समृद्ध तसेच संस्कारित करते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या 450 विज्ञापीठांमध्ये ही भाषा शिकण्याची आणि शिकवण्याची कुवत निर्माण होईल. 1200 ग्रंथालयांमध्ये ई-बुक्स स्वरुपात अनेक ग्रंथ उपलब्ध होतीत. नवीन पिढीला आवडेल अशा पद्धतीने ते त्यांचा आस्वाद घेऊ शकतील. हव्या त्या मार्गाने ते या भाषेपर्यंत पोहोचू शकतील. या सगळ्या गोष्टींसाठीच आपल्या भाषेच्या अभिजात दर्जासाठी प्रत्येकाने आग्रही राहणे गरजेचे आहे.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे मराठी साहित्य विपुल आहे. लेखक अतिशय चांगले लिहित आहेत. चित्रसृष्टीबद्दल बोलायचे झाले तर दर्जेदार चित्रपट तयार होतात. कारण त्याला तशा दर्जेदार कथांचा पाया असतो. म्हणूनच मराठीतली अशी समृद्ध साहित्यनिर्मिती अधिक ठोसपणे पुढे आणणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी मराठी लिहिण्याची आणि वाचण्याची सक्ती करण्याची वेळ आली तरी हरकत नाही, असे माझे मत आहे. नवीन पिढीवर चांगल्या गोष्टी लादल्याने त्यांचे काहीही नुकसान होत नाही. मराठी ही राज्यभाषा आहे, अभिजात भाषा आहे आणि ती तुम्ही शिकायची आहे, त्या भाषेतले साहित्य वाचायचे आहे असा आग्रह धरणेही चुकीचे नाही. शेवटी काही वेळा औषध देतातच. कधी ते आजार दूर करते तर कधी ते टॉनिक म्हणूनही काम करते. म्हणूनच ते गरजेचे असते आणि कालांतराने त्याचा उपयोग अथवा परिणाम समोर येत असतो. काळ उलटला की देहाला आणि बुद्धिला त्याचे महत्त्व कळते.

पेन्सिलला टोक केल्याने ती अधिक ठळक आणि स्पष्ट लिहिते हे सत्य सगळ्यांनाच ठाऊक आहे. याच धर्तीवर बोलायचे तर विचार करतो तेव्हा मेंदू अधिक अचूकपणे काम करु लागतो. मराठी भाषेतल्या साहित्याच्या प्रत्येक अंगांमध्ये ही ताकद आहे. म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येऊन मराठी भाषा दिन आनंदाने साजरा करु आणि तिचा गौरव अनंत काळ टिकेल अशी आशा व्यक्त करु.

डॉ. निशिगंधा वाड, अभिनेत्री

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या