Thursday, May 15, 2025
Homeक्रीडाInd vs Aus 1st T20 : ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६२ धावांचे आव्हान

Ind vs Aus 1st T20 : ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६२ धावांचे आव्हान

दिल्ली | Delhi

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून (४ डिसेंबर) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मनुका ओव्हल स्टेडियमवर होत आहे.

पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळी आणि रविंद्र जाडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने १६१ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवत त्यांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. परंतू जाडेजाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत टीम इंडियाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. शिखर धवन मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटही फारशी चमक दाखवू शकला नाही. फिरकीपटू स्वेप्सनच्या गोलंदाजीवर विराट ९ धावा काढून माघारी परतला. एकीकडे लोकेश राहुल एक बाजू लावून धरत फटकेबाजी करत होता, परंतू दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने भारतीय फलंदाज आपली विकेट फेकत होते. संजू सॅमसन, मनिष पांडेही फारकाळ तग धरु शकले नाहीत. अर्धशतक झळकावल्यानंतर लोकेश राहुल हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४० चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावा केल्या.

यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजी करत भारताची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतू हार्दिक हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर उर्वरित भारतीय फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला १६१ धावांचा टप्पा गाठून दिला. ऑस्ट्रेलियाकडून हेन्रिकेजने ३ तर स्वेप्सन-झॅम्पा आणि स्टार्क यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या