मुंबई | Mumbai
सिडनी क्रिकेट मैदानावर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना सुरु झाला आहे. तीन सामन्यांच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने १-० अशी लढत घेतली असून मालिकेतील अस्तित्व टिकवण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणे आश्यक आहे.
आज दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आहे. सिडनीच्या मैदानावर दुसऱ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३८९ धावांचा डोंगर उभा केला असून मालिकेत आपलं आव्हान कायम राखून ठेवण्यासाठी भारताला ३९० धावांची गरज आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या संघाने घेतला. परंतू बुमराह आणि शमीची षटकं सावधपणे खेळून काढत फिंच आणि वॉर्नर जोडीने खेळपट्टीवर आपला जम बसवला. यानंतर दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सामन्याप्रमाणेच फटकेबाजी सुरुवात केली.
पॉवरप्लेच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडण्यात अपयशी ठरले. दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. अखेरीस मोहम्मद शमीने कर्णधार फिंचला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं, त्याने ६० धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने डेव्हिड वॉर्नरही जाडेजाच्या गोलंदाजीवर चोरटी दुहेरी धाव घेत असताना श्रेयस अय्यरच्या अचूक फेकीमुळे धावबाद झाला. वॉर्नरने ७७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८३ धावा केल्या.
यानंतर मैदानावर आलेल्या स्टिव्ह स्मिथने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत फटकेबाजीला सुरुवात केली. दोन विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाला स्मिथने पुन्हा एकदा बॅकफूटला ढकललं. मार्नस लाबुशेनसोबत स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत स्मिथने चौफेर फटकेबाजी केली. ६४ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने स्मिथने १०४ धावा केल्या.
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर स्मिथ शमीकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर लाबुशेनने मॅक्सवेलच्या साथीने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला त्रिशतकी धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान लाबुशेनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. ४९ व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर ७० धावा काढून तो माघारी परतला. नवदीप सैनीच्या अखेरच्या षटकात मॅक्सवेलनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं, त्याने नाबाद ६३ धावा केल्या.