मुंबई | Mumbai
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी(६ डिसेंबर) होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ४ बाद १९४ धावा केल्या. तसेच भारताला विजयासाठी धावांचे आव्हान दिले आहे.
नाणेफेक जिंकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणाऱ्या मॅथ्यू वेडने धडाकेबाज सुरुवात करत भारतावर दबाव आणायला सुरुवात केली. मॅथ्यू वेड आणि डार्सी शॉर्ट या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. अखेरीस नटराजनने डार्सी शॉर्टला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर कर्णधार वेडने स्मिथच्या साथीने छोटेखानी भागीरादीर करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान वेडने आपलं अर्धशतकही साजरं केलं. परंतू वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर मैदानात उडालेल्या गोंधळता वेड धावबाद झाला. त्याने ३२ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या.
यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजीला सुरुवात करत भारतावर दबाव आणायला सुरुवात केली. परंतू शार्दुलने मॅक्सवेलला माघारी धाडत भारताला महत्वाची विकेट मिळवून दिली, त्याने २२ धावा केल्या. भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या टी-२० सामन्यात गलथान क्षेत्ररक्षण केलं. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धेतला. फटकेबाजी करणारा स्टिव्ह स्मिथही चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ३८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा केल्या. भारताकडून नटराजनने दोन तर शार्दुल ठाकूर आणि चहल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.