मुंबई | Mumbai
सलामीवीर शिखर धवनच्या अर्धशतकी आणि हार्दिक पांड्याच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळविला आहे. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
१९५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारत सहज हार मानणार नाही हे स्पष्ट केलं. ५६ धावांची भागीदारी झाल्यानंतर अँड्रू टायने राहुलला माघारी धाडलं. यानंतर शिखर आणि विराटने पुन्हा एकदा जम बसवत भारताच्या डावाला आकार दिला. यादरम्यान शिखरने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावलं. ही जोडी मैदानावर कमाल करणार असं वाटत असतानाच, झॅम्पाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिखर बाद झाला. त्याने ३६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली.
फलंदाजीत बढती मिळालेल्या संजू सॅमनने काही चांगले फटके खेळत आश्वासक सुरुवात केली. परंतू हाराकिरी करत त्याने विकेट फेकत भारताच्या अडचणींमध्ये भर घातली. स्वेप्सनने सॅमसनचा बळी घेतला. यानंतर विराट कोहलीने पांड्याच्या साथीने सुरेख फटकेबाजी करत भारताचं आव्हान कायम ठेवलं. परंतू अखेरच्या षटकांमध्ये धावांचं आव्हान लक्षात घेता फटकेबाजी करण्याच्या नादात विराट डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ४० धावांची खेळी केली. यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली आणि भारताचं आव्हान कायम ठेवलं. अखेरच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी २५ धावांची गरज होती. भारतीय फलंदाजांनी हे आव्हान सहज पूर्ण करत सामना खिशात घातला.
कर्णधार मॅथ्यू वेडचं अर्धशतक आणि त्याला स्टिव्ह स्मिथने फटकेबाजी करत दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली. भारताला हा सामना जिंकण्यासाठी १९५ धावांचं आव्हान मिळालं आहे. भारतीय संघाने आजच्या सामन्यात क्षेत्ररक्षणात निराशाजनक कामगिरी केली. परंतू मोक्याच्या षटकांमध्ये कांगारुंना मोठे फटके खेळण्यापासून रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. परंतू डेथ ओव्हर्समध्ये फटकेबाजी करुन ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार वेडने ५८ तर स्मिथने ४६ धावांचं योगदान दिलं.
नाणेफेक जिंकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणाऱ्या मॅथ्यू वेडने धडाकेबाज सुरुवात करत भारतावर दबाव आणायला सुरुवात केली. मॅथ्यू वेड आणि डार्सी शॉर्ट या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. अखेरीस नटराजनने डार्सी शॉर्टला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर कर्णधार वेडने स्मिथच्या साथीने छोटेखानी भागीरादीर करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान वेडने आपलं अर्धशतकही साजरं केलं. परंतू वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर मैदानात उडालेल्या गोंधळता वेड धावबाद झाला. त्याने ३२ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या.
यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजीला सुरुवात करत भारतावर दबाव आणायला सुरुवात केली. परंतू शार्दुलने मॅक्सवेलला माघारी धाडत भारताला महत्वाची विकेट मिळवून दिली, त्याने २२ धावा केल्या. भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या टी-२० सामन्यात गलथान क्षेत्ररक्षण केलं. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धेतला. फटकेबाजी करणारा स्टिव्ह स्मिथही चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ३८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा केल्या. भारताकडून नटराजनने दोन तर शार्दुल ठाकूर आणि चहल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.