मेलबर्न –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसर्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणे याने
नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे. पावसाचा व्यत्यय आला तेव्हा अजिंक्य रहाणे 53 रनवर नाबाद तर रविंद्र जडेजा 4 रनवर खेळत आहेत.
रहाणेनं टीम इंडियाला आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात भारतानं 62 षटकांत 5 बाद 185 धावा केल्या आहेत. वृद्धीमान साहाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रिषभ पंतला मोठी खेळी करण्याची संधी होती. त्यानं आक्रमक खेळ करून तसा विश्वास दाखवला, पण मिचेल स्टार्कनं त्याला बाद केले. रहाणेनं अर्धशतकी खेळी करून महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियावर जबाबदारी आहे ती मोठी आघाडी घेण्याची. पहिल्या दिवशी मयांक अग्रवाल भोपळा न फोडता माघारी परतला, परंतु पदार्पणवीर शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाला सावरले. दुसर्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर पुजारासाठी ऑसींनी ऊठड घेतला, परंतु तो अपयशी ठरला. 22व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑसींना दिवसाचे पहिले यश मिळाले. 65 चेंडूंत 8 चौकारांसह 45 धावा करणारा गिल कमिन्सच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक टीम पेनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पुजारा 17 धावांवर बाद झाला.
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी ऑसी गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. दोघांनी संयमी खेळी करताना 52 धावांची भागीदारी केली. नॅथन लियॉननं त्यांची एकाग्रता भंग केली अन् जोरदार फटका मारण्याच्या नादात विहारी ( 21) झेलबाद झाला. संघात पुनरागमन करणार्या रिषभ पंतनं आक्रमक खेळावर भर दिला. त्यानं ऑसींचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स यालाच लक्ष्य केले. पंतच्या आक्रमक खेळीमुळे ऑसींना त्यांचे डावपेच बदलावे लागले. पंतनं पाचव्या विकेटसाठी अजिंक्यसह 73 चेंडूंत 50 धावांची भागीदारी केली. मिचेल स्टार्कनं पंतला माघारी जाण्यास भाग पाडले. 29 धावांवर तो माघारी परतला. रहाणे एका बाजूनं खिंड लढवत आहे आणि त्यानं अर्धशतक पूर्ण केलं.
भारतीय संघात 5 किंवा त्याहून खालच्या क्रमवारीत फलंदाजीला येऊन परदेशात सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमात रहाणे तिसर्या स्थानावर पोहोचला. कसोटीतील त्याचे हे 23वे अर्धशतक आहे आणि परदेशातील 20 वे. त्यानं 62 डावांमध्ये परदेशात 20 अर्धशतकं झळकावताना महेंद्रसिंग धोनीचा 19 अर्धशतकांचा विक्रम ( 83 डाव) मोडला.
पाच किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर परदेशात सर्वाधिक अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज
28 – व्ही व्ही एस लक्ष्मण ( 84 डाव)
24 – सौरव गांगुली ( 85 डाव)
20 – अजिंक्य रहाणे ( 62 डाव)
19 – महेंद्रसिंग धोनी ( 83 डाव)
16 – मोहम्मद अझरुद्दीन ( 66 डाव)