मुंबई | Mumbai
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) स्पर्धेच्या साखळी फेरीच्या लढतींचा थरार आटोपला असून, स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना आज (मंगळवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे तर ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथकडे सोपविण्यात आले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना साखळी फेरीत न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश संघाला पराभवाची धूळ चारून गुणतालिकेत ६ गुणांची कमाई करत अव्वल स्थान निश्चित केले आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने बंद गटात इंग्लंड विरुद्ध ५ गडी राखून विजय संपादन करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. मात्र, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान संघाविरुद्ध सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या खात्यात ४ गुण जमा असून, गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघ (Australia Team) दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ४ सामने खेळविण्यात आले आहेत. यात भारतीय संघाने २ तर ऑस्ट्रेलिया संघाने १ सामना जिंकला आहे.
आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप (ICC ODI World Cup) २०२३ च्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांत २ सामने खेळविण्यात आले होते. यात भारतीय संघाने चेन्नई येथील पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात विजय संपादन केला होता. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव करून पॅट कमिन्सच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे.
दरम्यान, विशेष म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने २००६ आणि २००९ मध्ये स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे विजेतेपदाची हॅट्रिक करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असणार आहे.त्यानंतर आता १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत पात्र ठरला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला आपली तिसरी अंतिम फेरी गाठण्याची संधी असणार आहे.