दिल्ली । Delhi
भारतीय संघाच्या मागे लागलेली दुखापतींची साडेसाती संपता संपत नाहीये. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने कसोटी सामन्यांना मुकणार असताना आता
के.एल राहुल देखील सरावादरम्यान दुखापग्रस्त झाला आहे. त्यामुळे राहुलला आगामी दोन कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार राहुलला सरावात दुखापत झाली. शनिवारी भारतीय संघ मेलबर्नच्या मैदानावर नेटमध्ये सराव करत असताना राहुलच्या डाव्या मनगटाला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला तीन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याने राहुल उर्वरित मालिकेला मुकणार असल्याचे समजते.
राहुल आता मायदेशी परतणार असून बंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेईल. मात्र ऑस्ट्रेलिया दौर्यावर तिसर्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता असतानाचा ही दुखापत झाल्याने भारतीय संघासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, रोहित शर्मा सिडनी येथे सात जानेवारीपासून खेळवण्यात येणाऱ्य़ा तिसऱ्य़ा कसोटीत खेळणार हे शुक्रवारी निश्चित झाले आहे. रोहित शर्मा याची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता तो तिसऱ्य़ा कसोटीत खेळणार की नाही याबाबत शंकाकुशंकाना पूर्णविराम मिळाला आहे. रोहित शर्माच्या समावेशामुळे मात्र सलामीवीर मयांक अग्रवाल व मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला डच्चू मिळणार हेही पक्के झाले आहे.