नवी दिल्ली | New Delhi
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना गाबाच्या मैदानावर पार पडला. पाचव्या दिवशी पावसामुळे जास्त खेळ होऊ शकला नसल्याने हा सामना अनिर्णित राहिला.ऑस्ट्रेलियाने भारताला २७५ धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात टीम इंडियाने एकही विकेट न गमावता ८ धावा केल्या होत्या. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये जोरदार पाऊस (Rain) झाला आणि खराब हवामानामुळे सामना अनिर्णित राहिला.यामुळे सध्या कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली असून आता पुढील सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४४५ धावा केल्या होत्या. यावेळी स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी शतके झळकावली होती.त्यामध्ये हेडने १५२ धावांची शानदार खेळी केली होती. तर स्मिथने १०१ धावा केल्या होत्या. तसेच ॲलेक्स कॅरीने ७० धावांची खेळी खेळली. पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने भारताकडून ६ विकेट घेतल्या होत्या. तर मोहम्मद सिराजने २ आणि आकाश दीप व नितीश रेड्डी यांनी १-१ विकेट घेतली होती.
दुसरीकडे भारताने (India) पहिल्या डावात सर्वबाद २६० धावा केल्या होत्या. यादरम्यान सलामीवीर के एल राहुलने महत्त्वाची भूमिका बजावली. राहुलने १३९ चेंडूंचा सामना करत ८९ धावा केल्या. त्याने ८ चौकार मारले, तर रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावले होते. त्याने १२३ चेंडूंचा सामना करत ७७ धावा केल्या. तर जडेजाच्या या खेळीत ७ चौकार आणि १ षटकारांचा समावेश होता. आकाश दीपने अखेरीस ३१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला.
आर. अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून आजचा माझा शेवटचा दिवस असेल असे म्हणत अश्विनने निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फिरकीपटू ठरला आहे.आर अश्विनने १०६ कसोटीमध्ये (Test) भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्याने २०० डावात ५३७ विकेट घेतल्या आहेत. त्याने ५ विकेट ३७ वेळा घेण्याचा विक्रमही केला असून कसोटीमध्ये ९०७ षटके निर्धाव टाकली आहेत. तसेच अश्विनने वनडेमधील ११४ डावात १५६ विकेट घेतल्या. तर टी २० मध्ये अश्विनच्या नावावर ७२ विकेट आहेत.तर अश्विन याने कसोटीच्या १५१ डावात ३५०३ धावा केल्या आहेत.यामध्ये ६ शतके आणि १४ अर्धशतकांचा सामवेश आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये ६३ डावात ७०७ धावा केल्या असून यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच टी २० मध्ये अश्विनने १८४ धावा केल्या आहेत.