मुंबई । Mumbai
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-२० सामन्यांना गुरुवारी (३ ऑगस्ट) सुरुवात झाली. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने त्यांचा चार धावांनी पराभव केला. या विजयासह यजमानांनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. याआधी टीम इंडियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-०आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता.
पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली. यजमान वेस्ट इंडिजने भारताला रोमहर्षक सामन्यात चार धावांनी पराभूत केले. विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या संघाने २० षटकांत ६ बाद १४९ धावा केल्या. टीम इंडियाला १५० धावांचे सोपे लक्ष्य गाठता आले नाही आणि २० षटकात ९ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या.
दरम्यान, १५० धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना पराभूत झाल्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. या नकोशा विक्रमाच्या यादीत एमएस धोनी आणि अजिंक्य रहाणे यांचाही समावेश आहे. कोणत्याही भारतीय कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळताना संघ १५० पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना पराभव होण्याची ही चौथी वेळ ठरली. या यादीत एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २ वेळा १५० पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना पराभूत झाला होता. तसेच, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताला एक वेळा १५० पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना पराभव पत्करावा लागला होता.
धोनीच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम २००९ साली दक्षिण आफ्रिकेच्या १३१ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ २० षटकात ८ विकेट्स गमावत ११८ धावाच करू शकला होता. त्यामुळे हा सामना दक्षिण आफ्रिकेने १२ धावांनी जिंकला होता. त्यानंतर धोनीच्याच नेतृत्वाखाली २०१६ मध्ये न्यूझीलंडच्या १२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या ७९ धावसंख्येवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडने ४७ धावांनी जिंकला होता. यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली २०१५ मध्ये भारतीय संघाला १५० पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना पराभव पत्करावा लागला होता. झिम्बाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्स गमावत १४५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने २० षटकात ९ विकेट्स गमावत फक्त १३५ धावाच केल्या होत्या. त्यामुळे झिम्बाब्वेने हा सामना १० धावांनी जिंकला होता.