Saturday, July 27, 2024
HomeनगरPhoto : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

Photo : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

अहमदनगर | Ahmednagar

करोनाच्या तिस-या लाटेचा (Corona third wave) सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif)) यांनी केले. संकटाच्या काळातही जिल्ह्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी राज्यस्तरावरुनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाटी पाठपुरावा सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.

- Advertisement -

Corona Update : जिल्ह्यात दैनंदिन करोना रुग्णसंख्येत किंचित घट; वाचा, ताजी आकडेवारी

स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त (Independence Day) येथील पोलीस परेड मैदानावर (Police parade ground) मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा (Government Flag Hoisting Ceremony) पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस प्रमुख मनोड पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. अशावेळी स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावणा-या स्वातंत्र्यसैनिकांचे (Freedom fighter) स्मरण आणि त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग, देशासाठी सर्वस्व ओवाळून दिलेली प्राणाची आहूती यांचे कायम स्मरण ठेवले पाहिजे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही अनेक आव्हानांचा सामना करत आधुनिक भारताची उभारणी करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांचे योगदान राहिले. विविध क्षेत्रात आपल्या देशाने गगनभरारी घेतली. जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून आपली नव्याने ओळख प्रस्थापित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सध्या करोनाचे (COVID19) आव्हान आपल्यासमोर असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, करोनाचा सामना करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना योगदान देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांचा आपण सामना केला. आता तिस-या लाटेचे संकट समोर आहे. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून आणि प्रत्येकाने योग्य ती काळजी घेत स्वताचे आरोग्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले.

करोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिली करोना चाचणी (COVID test) प्रयोगशाळा कार्यान्वित केली. सध्या चाचण्यांची संख्या प्रतिदिन १५ हजाराहून अधिक वाढविली आहे. एकूण २३ लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात नव्याने १४ पीएसए प्लान्ट आपण उभारत असून त्यातील काही सुरुही झाले आहेत. संभाव्य तिस-या लाटेत आवश्यक ऑक्सीजन व्यवस्था आपण उभी करीत आहोत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने १०० कोटी रुपयांची कामे करण्यात आली असून ५० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याचे सांगून नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी नमूद केले. लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न असून आतापर्यंत १३ लाख ७२ हजाराहून अधिक डोसेस आपण दिले आहेत. लशीचा अधिक साठा उपलब्ध व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री म्हणाले, करोना रोखण्यासाठी आरोग्य, महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, महानगरपालिका यंत्रणांनी या कालावधीत अथक परिश्रम घेतले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच स्वयंसेवी संस्था, संघटना यांनीही याकामी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. कोरोनाचे संकट असतानाही जिल्ह्याचा विकास कामांकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतक-यांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. विकेल ते पिकेल या संकल्पनेनुसार शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रयत बाजार सुरु करण्यात येत आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यासाठी ११ कोटी २९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेत कांदाचाळ उभारणी, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती यातील लाभार्थींना अनुदानाचे वितरण आपण केले आहे. कृषी सिंचन योजने अंतर्गत आतापर्यंत ६१ हजाराहून अधिक शेतकर्‍यांना ठिबक आणि तुषार सिंचनाचा लाभ आपण दिला आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत १० लाखाहून अधिक शेतक-यांना ६५ कोटीहून अधिक नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जवळपास पावणेतीन लाख शेतक-यांना २२०२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांनी कर्जवाटपाचा वेग अधिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या काही तालुक्यात सलग तीन आठव़ड्याहून अधिक काळ पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या काळात पुरेसा पाऊस पडेल, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.

नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा विकासासाठी वार्षिक योजनेत ५११ कोटी रुपयांची तरतूद आपण केली आहे. सामाजिक न्यायाच्या योजनांची अंमलबजावणीसाठी १४४ कोटी रुपयांची तर आदिवासी विकास योजनांसाठी ४६ कोटी रुपये तरतूद करण्यात आली. लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात १८ लाख ५० हजाराहून अधिक शिवभोजन थाळ्यांच्या माध्यमातून गरजूंची पोटाची भूक भागवली गेली. त्यासाठी जवळपास पावणेपाच कोटी रुपयांहून अधिक तरतूद आपण त्यावर खर्च केल्याची माहिती त्यांनी दिली.

ग्रामविकासासाठी आपण विविध लोकोपयोगी निर्णय घेतले. कै. आर.आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना, स्थानिक स्वराज्य संस्था बळकटीकरणासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांनाही देणे, ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी महाआवास योजना -ग्रामीण अभियानाची अंमलबजावणी, देशासाठी लढणार्‍या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून आजी-माजी सैनिकांना मालमत्ता करातून सवलत आणि शिवराज्याभिषेक दिन म्हणून ०६ जून हा दिवस शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यास आपण सुरुवात केल्याचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. जिल्ह्यात महसूल विभागाने राबविलेल्या महसूल विजय सप्तपदी अभियानात अतिक्रमित रस्ते मोकळे करणे, गाव तेथे स्मशानभूमी, मंजूर घरकुलासाठी जागा देणे, भूतपूर्व खंडक-यांना जमीन वाटप, तुकडेजोड- तुकडेबंदी अंतर्गत नागरिकांना लाभ देणे आदी उपक्रम राबविले. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित कामे मार्गी लागली. त्याचा थेट लाभ शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना झाल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आजपासून ते पुढील २६ जानेवारी, २०२२ पर्यंतच्या कुपोषणमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात आजपासून ई-पीक पाहणी अभियानास सुरुवात होत आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद आता अॅपद्वारे स्वता करता येणार आहे, यापूर्वी पारंपरिक पद्धतीने तलाठ्यांमार्फत पीकपेरा नोंद केली जात होती. आता शेतकरी स्वता ती नोंद करु शकतील. डीजीटल कृषी क्रांतीपर्वाकडे आपण वाटचाल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी पोलीस दलाच्या बॅंडपथकाने राष्ट्रगीत वाजविले तर पोलीस निरीक्षक श्री. हाटकर यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते, जम्मू काश्मीर सीमेलगत कलाल सेक्टरमध्ये सेवा बजावताना अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या वीरपत्नी मंगला वलटे यांना तसेच मराठा इन्फ्रंन्ट्री बटालियन मध्ये सेवेत असताना सेवा बजावताना गंभीर जखमी झालेले नायब सुभेदार रावसाहेब शेंडकर यांना ताम्रपट देऊन गौरविण्यात आले.

महाआवास अभियान- ग्रामीण मध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य योजनेत उत्कृष्ट काम करणार्‍या अकोले, जामखेड, कर्जत, शेवगाव, नेवासा तालुक्यांना गौरवण्यात आले. कोरोना कालावधीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, करोना योध्दा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आणि आदर्श तलाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशांत हासे यांना पालकमंत्री# मुश्रीफ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपजिल्हाधिकारी सर्वश्री जितेंद्र पाटील, पल्लवी निर्मळ,जयश्री आव्हाड, उर्मिला पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, तहसीलदार उमेश पाटील, वैशाली आव्हाड, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी महेश शिंदे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी नकासकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या