चाळीसगाव । प्रतिनिधी
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुनील ताराचंद मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी, महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. चाळीसगाव विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत श्री मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
त्यांचा अनुक्रमांक 8 असून निशाणी शिट्टी होती. आता त्यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेत असल्याने तसे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहे, त्याचप्रमाणे जाहीर पाठिंबाचे पत्र आमदार मंगेश चव्हाण यांना दिले असून त्यात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांचा एकूणच विकास कामांचा झंझावात पाहता तसेच कुठलाही भेदभाव न करता सर्वसमावेशक विविध सामाजिक व जाती धर्मासाठी त्यांनी केलेली विकास काम पाहता तेच विधानसभेसाठी योग्य उमेदवार आहेत अशी माझी खात्री झाली असल्याने मी या निवडणुकीतून विनाशर्त व कुठल्याही दबावाखाली न येता माघार घेत आहे. असे नमूद केले आहे. तसेच त्यांनी जी आश्वासने प्रचाराच्या निमित्ताने आदिवासी समाजाला दिली होती ती पुढील काळात आमदार मंगेशचव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा शब्द समाज बांधवांना दिला आहे, आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यात आजपर्यंत कोणी केले नाही असे विकास कामे आदिवासी समाजासाठी केले असल्याने व भविष्यात देखील ते अधिक विकास कामे करू शकतील याचा विश्वास मला असल्याने सर्व समाज बांधवांनी अनुक्रमांक 2 समोरील कमळ चिन्हापुढील बटण दाबून मंगेश रमेश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्यावे असे जाहीर आवाहन त्यांनी आहे. श्री.मोरे हे आदिवासी समाजाचे युवा कार्यकर्ते असून त्यांच्यामुळे मंगेश चव्हाण यांना निश्चितच लाभ मिळणार आहे.
त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मदतीला मिळणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील आदिवासी समाजासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. चाळीसगाव विधानसभा मतदार संघात मंगेश चव्हाण यांच्या प्रचारात चांगलाच उत्साह दिसून येत असून यात युवकांसह महिला वर्गाचाही चांगला सहभाग दिसत आहे.