Wednesday, June 19, 2024
Homeराजकीयभाजप सरकार संकटात; तीन अपक्ष आमदारांनी सोडली साथ

भाजप सरकार संकटात; तीन अपक्ष आमदारांनी सोडली साथ

दिल्ली । Delhi

- Advertisement -

हरियाणातील भाजप सरकार संकटात आले असून, तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचे सरकार अल्पमतात आले आहे. हे तिन्ही आमदार आता काँग्रेसच्या बाजूने गेले आहेत.

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत पुंद्री येथील अपक्ष आमदार रणधीर गोलन, निलोखेरीतील धरमपाल गोंदर आणि चरखी दादरी येथील सोमवीर संगवान यांनी पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. सरकारच्या धोरणांवर आपण नाखूश असल्यामुळे भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे या तिन्ही अपक्ष आमदारांनी सांगितले. दरम्यान, अपक्ष आमदारांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतल्याने हरियाणातील बहुमताचे गणित बिघडले आहे. ९० जागांच्या हरियाणा विधानसभेत बहुमताचा आकडा ४६ आहे. भाजपकडे ४१ आमदार असून त्यांना ६ अपक्ष आमदारांचाही पाठिंबा होता. यापैकी तिघांनी आता पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे आता हरियाणातील सैनी सरकारकडे फक्त ४४ आमदार शिल्लक आहेत.

आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी म्हणाले की, मला आताच ही माहिती मिळाली आहे. कदाचित काँग्रेस आता काही लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यात गुंतली आहे. काँग्रेसला जनतेच्या इच्छेशी काहीही देणेघेणे नाही. तर, दुसकडे काँग्रेस खासदार दीपेंद्रसिंग हुडा म्हणाले, राज्यातील (हरियाणा) परिस्थिती भाजपच्या विरोधात आहे, त्यामुळे बदल होणे निश्चित आहे. भाजप सरकारने बहुमत गमावले आहे.

अविश्वास ठराव आणता येणार नाही

हरियाणातील भाजपचे सरकार अल्पमतात असले तरी विरोधकांना अविश्वास ठराव आणता येणार नाही. कारण काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणला होता. हा प्रस्ताव भाजप सरकारने आवाजी मतदानाने जिंकत बहुमत सिध्द केले होते. त्यामुळे आता पुढील सहा महिने पुन्हा प्रस्ताव आणता येणार नसल्याने भाजपला काहीसा दिलासा मिळणार आहे. पुढील काही महिन्यांतच विधानसभेची निवडणूक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या