कोलंबो | वृत्तसंस्था
आय सी सी टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तानचा चुरशीचा सामना आज श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा मैदानावर खेळण्यात आला. ईशान किशनच्या ७७ धावांच्या तडाखेबाज फलंदाजीने भारतीय संघाने पाकिस्तानला १७६ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानी खेळाडूंनी सर्व गडी बाद ११४ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाने पाकिस्तानवर ६१ धावांनी विजय मिळविला. आजच्या या सामन्यातील विजयाने भारतीय संघाला सुपर 8 फेरीत स्थान मिळाले आहे.
पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून ईशान किशन व अभिषेक शर्मा सलामीला फलंदाजीस आले. ईशान किशनने जोरदार फटकेबाजी करत भारतीय संघ्याच्या फलंदाजीस सुरवात केली. सामन्याच्या पहिल्याच षटकात सलमान अली आगाच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूत शाहीन आफ्रिदीने सलामीला आलेल्या भारतीय अभिषेक शर्माला शून्य धावसंख्येवर झेल बाद केले. ईशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांना जेरीस आणून सोडत ४० चेंडूत ३ षट्कार व १० चौकार लगावत एकूण ७७ धावा केल्या.सामन्याच्या ९ व्या षटकात सईम अयुबच्या गोलंदाजीवर ईशान किशन बाद झाला. ९ व्या षटका अखेर भारतीय संघाने २ गडी बाद ८९ धावा केल्या.सामन्याच्या १५व्या षटकात सईम अयुबच्या गोलंदाजीवर तिलक वर्मा पायचीत झाला. तिलक वर्माने २४ चेंडूत २५ धावा केल्या.
पंधराव्या षटकात सईम अयुबच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्या बाबर आझम कडून शून्य धाव संख्येवर झेलबाद झाला.१५ व्या षटकाअखेरीस भारतीय संघाच्या ४ गडी बाद १२७ धावा केल्या. १९व्या षटकात उस्मान तारिकच्या गोलंदाजीवर भारतीय संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादवला सईम अयुबने झेल बाद केले.सुर्यकुमार यादवने २९ चेंडूत ३२ धावा केल्या. २० व्या षटकात मोह्ह्म्द नवाजने शिवम दुबेला धावचीत केले. शिवम दुबेने १७ चेंडूत २७ धावा केल्या.पाठोपाठ अखेरच्या षटकातील शेवटच्या चेंडूत अक्षर पटेल सईम अयुब करवी झेल बाद झाला. २० व्या षटका अखेर भारतीय संघाने ७ गडी बाद १७५ धावा करत पाकिस्तानच्या संघास १७६ धावांचे आव्हान दिले.
पाकिस्तानच्या संघाकडून साहिबजादा फरहान व सईम अयुब प्रथम फलंदाजीस आले. पहिल्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर साहिबजादाला रिंकू सिंगने झेल बाद करत पाकिस्तानच्या संघास पहिला धक्का दिला.पाठोपाठ दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सईम अयुब ६ धावा करून पायचीत झाला. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूत पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाला हार्दिक पांड्याने अवघ्या चार धावांवर झेल बाद करत पाकिस्तानी संघास तिसरा धक्का दिला. ५ व्या षटकात अक्षर पटेलने बाबर आझमला क्लीन बोल्ड करत ५ धावांवर तंबूत परत पाठविले.
दहाव्या षटकात मैदानात फलंदाजीस तग धरून राहणाऱ्या उस्मान खानला इशान किसनने यष्टी चीत केले उस्मान खानने ३४ चेंडूत ४४ धावा केल्या. १२ व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने मोहम्मद नवाजला ४ धावांवर झेल बाद करत पाकिस्तानच्या संघास सहावा धक्का दिला.पाठोपाठ १३ व्या षटकात तिलक वर्माच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने शादाब खानला १४ धावांवर झेल बाद केले. १६ व्या षटकात वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर रिंकू सिंगने फहीम अश्रफला १० धावांवर झेल बाद करत पाकिस्तानच्या संघास ८ वा धक्का दिला. फहीम अश्रफ नंतर लागोपाठ अब्रार अहमद वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. शाहीन आफ्रिदीने नाबाद २३ धावा केल्या तर अखेरचा खेळाडू उस्मान तारिकला हार्दिक पांड्याने शून्य धाव संख्येवर क्लीन बोल्ड केले.





