Wednesday, October 7, 2026
Homeराजकीयइंडिया आघाडीचा मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवला, विरोधकांचा आयोगाच्या मुख्यालयापासून 100 मीटरवर ठिय्या

इंडिया आघाडीचा मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवला, विरोधकांचा आयोगाच्या मुख्यालयापासून 100 मीटरवर ठिय्या

दिल्ली | Delhi

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि केंद्र सरकारच्या कथित हस्तक्षेपाविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर मंगळवारी (६ ऑक्टोबर) ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या प्रमुख खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. मात्र, दिल्ली पोलिसांनी कडक नाकाबंदी करत हा मोर्चा मुख्यालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर अडवला. यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी थेट रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

ज्ञानेश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यानुसार काम करत असून आयोग केंद्र सरकारच्या हातातील ‘बाहुली’ बनल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. मोर्चा रोखल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, “ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे,” असा थेट इशारा दिला. तर “लोकांना गुलाम बनवण्याचा हा प्रयत्न असून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील,” असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

विरोधकांच्या ३ प्रमुख मागण्या:

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा.
वादग्रस्त ‘SIR’ प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी.
आगामी सर्व निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनऐवजी (EVM) बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात.

सध्या जंतर-मंतर आणि संसद मार्ग परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विरोधकांच्या या आंदोलनामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या