दिल्ली | Delhi
देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण कमालीचे तापले असून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष थेट रस्त्यावर आला आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करत मंगळवारी तब्बल १९ विरोधी पक्षांच्या खासदारांनी नव्या संसद भवनापासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत ‘लोकशाही वाचवा’ (Save Democracy) या बॅनरखाली धडक मोर्चा काढला. मात्र, दिल्ली पोलिसांनी कडक नाकाबंदी करत मोर्चा अडवल्याने संतप्त झालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह शेकडो खासदारांनी थेट रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने दिल्लीत प्रचंड राजकीय गोंधळ उडाला आहे.
संसदेच्या आवारातून हातात ‘लोकशाही वाचवा’ अशा घोषणांचे फलक घेऊन निघालेल्या या मोर्चात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह इतर घटक पक्षांचे खासदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र, सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी संसद मार्ग, जंतर-मंतर आणि निवडणूक आयोग कार्यालयाबाहेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. पोलिसांनी पुढे जाण्यास मज्जाव करताच खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या मोर्चात बहुतांश विरोधी पक्ष एकत्र दिसले असले, तरी आम आदमी पक्ष (AAP) आणि द्रमुक (DMK) या दोन प्रमुख पक्षांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली.
मोर्चादरम्यान पत्रकारांशी बोलताना समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सातत्याने असे निर्णय घेत आहेत, जे देशाची लोकशाही, संविधान आणि प्रस्थापित कायद्यांच्या पार विरोधात आहेत. खुद्द इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवरूनही हे स्पष्ट झाले आहे,” असा दावा त्यांनी केला. यादव पुढे म्हणाले की, “अखिलेश यादव यांच्यासह संपूर्ण विरोधी पक्षाने या कारभाराला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शवला आहे. ज्ञानेश कुमार यांची पदावरून हकालपट्टी होत नाही किंवा ते स्वतः राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आमचा हा संघर्ष असाच सुरू राहील.”




