श्रीनगर – भारतीय सैन्याने शुक्रवारी थेट पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या लाँच पॅडसवर हल्ला केला. सैन्याने अत्यंत अचकू प्रहार करत लाँच पॅड उद्ध्वस्त केले. भारताने ही कारवाई करुन काश्मीरच्या केरान सेक्टरमध्ये शहीद झालेल्या पाच कमांडोंच्या मृत्यूचा बदला घेतला. भारताने या हल्ल्यासाठी बोफोर्स तोफाचा वापर केला.
भारताने या कारवाईतून नापाक कारस्थाने रचणार्या पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भारताने ड्रोन विमानाच्या मदतीने या हल्ल्याचा व्हिडीओ शूट केला. आम्ही फक्त तुम्हाला मारणारच नाही, तर कसे मारतो ते संपूर्ण जगाला दाखवणार हा स्पष्ट संदेश भारताने या कारवाईतून दिला आहे.
सध्या संपूर्ण जग करोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारताप्रमाणे पाकिस्तानही करोनामुळे चिंतेत आहे. पण या परिस्थितीतही पाकिस्तानने आपल्या नापाक कारवाया बंद केलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी उत्तर काश्मीरच्या केरान सेक्टरमध्ये काही दहशतवादी घुसले होते. पाकिस्तानातून त्यांनी घुसखोरी केली होती.
भारताच्या स्पेशल फोर्सेसच्या जवानांनी प्राणाची बाजी लावून त्यांच्याशी मुकाबला केला व पाच दहशतवाद्यांना तिथेच संपवले. या मध्ये स्पेशल फोर्सेसचे पाच जवान शहीद झाले. ही लढाई इतकी भीषण होती की, कमांडो आणि दहशतवाद्यांमध्ये समोरासमोर लढाई झाली. भारताने शुक्रवारी थेट लाँच पॅड उडवून पाकिस्तानच्या घुसखोरीचा बदला घेतला. याच लाँच पॅडवरुन भारतात दहशतवादी पाठवले जात होते. भारतीय सैन्याने हल्ल्यासाठी 155 एमएम बोफोर्स तोफांचा वापर केला.