सुरेखा बोऱ्हाडे
भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. प्रगत मानवाची सर्वात प्रथम ओळख म्हणजे त्याने लावलेला शेतीचा शोध. हा शेतीचा शोध लावला तो स्त्रियांनी. शेतीमुळे शिकारीसाठी वन-वन भटकणार्या मानवी जीवनास स्थिरता आली आणि त्याचा विकास झाला. शेती विकासाबरोबर आपली आदिम आणि आदिवासी संस्कृती जपत भारतातील छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्याचा इतिहास प्रेरणादायी आहे.
14 व्या शतकात बस्तर राज्याची स्थापना अन्नमदेव यांनी केली. इंद्रावती नदीच्या काठी बस्तरचे राज्य समृद्ध झाले. बस्तरमधील नागराजा सोमेश्वरदेव प्रथम यांचा कार्यकाळ सुवर्णकाळ मानला जातो. या राज्यशासकांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नाग शासनकर्ते आणि त्यांच्या परिवारातील व्यक्ती जनतेशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत असत. जनता प्रत्यक्ष राजाशी संवाद साधत असे. त्यामुळे जनतेच्या समस्यांचे निराकरण तत्काळ केले जाई. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या नाग राजकुळातील परिवारामध्ये स्त्रियांना पुरुषांबरोबरीने सर्व अधिकार होते. राज्यकारभारात महिला आवडीने कार्य करत असत. राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी राज परिवारातील महिला राज्यकारभारात मदत करत असत. पुरुषांच्या बरोबरीने राज्यकारभारात त्यांना अधिकार होते.
याचा प्रत्यक्ष दाखला म्हणजे बस्तरमधील दंतेवाडा येथील दंतेश्वरी मंदिरातील नाग युगातील एक शिलालेख आजही उपलब्ध आहे. या शिलालेखात नागराजा यांची बहीण मासकदेवी यांनी शेतकर्यांसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती अभिलिखित केली आहे. हा शिलालेख तेलगू भाषेत आहे. यावरून नागराज्यात पुरुष शासकांबरोबर स्री शासकांच्या निर्णयाला किती महत्त्व होते हे लक्षात येते. शिलालेख नक्की कोणत्या काळातील आहे याची नोंद शिलालेखावर नाही. परंतु मासकदेवी ही नागराज सोमेश्वरदेव यांची लहान बहीण होती.
राजा सोमेश्वरदेव यांचा कार्यकाळ इ.स. 1069 ते इ. स. 1108 पर्यंतचा मानला जातो. सोमेश्वरदेव यांचा इ.स. सन 1069 मध्ये राज्याभिषेक झाला. याकाळातच मासकदेवी यांनी आपल्या बंधूला राज्यकारभारात मोलाची मदत केली. आज छत्तीसगडमधील जो बस्तर जिल्हा आहे तो भाग त्याकाळातील नाग समूहाचे चक्रकोट राज्य या नावाने प्रसिद्ध होते. ते अतिशय संपन्न आणि सुखी राज्य होते.
लाला जगदलपुरी यांनी बस्तर इतिहास एवं संस्कृती या पुस्तकात मासकदेवी यांचा उल्लेख असा केला आहे, दंतेवाडा येथे मिळालेल्या शिलालेखानुसार चक्रकोटमधील नाग कुळात सोमेश्वरदेव नावाचा प्रतापी राजा होऊन गेला. त्याची एक विद्वान बहीण होती. तिचे नाव मासकदेवी होते. तिने तत्कालीन परिस्थितीत नारी सन्मान, प्रजाप्रेम, प्रजासेवा, कृषी विकास यासाठी कौतुकास्पद कार्य केले. त्यासाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या. शिलालेखाचा काळ अज्ञात असला तरी त्यात सूचित केले आहे की, राजाचे अधिकारी कर वसूल करण्यासाठी शेतकर्यांना त्रास देतात. अनावश्यक व अयोग्य पद्धतीने शेतकर्यांकडून कर वसूल करतात. तेव्हा प्रजाहित लक्षात घेऊन पाच महासभा आणि शेतकर्यांचे प्रतिनिधी यांनी मिळून नियम बनवला की राज्याभिषेकाच्या वेळी ज्या गावातून कर वसूल केला जातो त्यामध्ये अशा नागरिकांकडून कर वसूल केला जावा जे गावात अधिक काळ रहिवासी आहेत. बाकी प्रजाजनांना त्रास देऊ नये. जे या नियमाचे पालन करणार नाहीत ते चक्रकोट शासकांचे आणि मासकदेवी यांचे विद्रोही आहेत, असे समजले जाईल. या शिलालेखाद्वारे दिली गेलेली राजाज्ञा ही राजाची बहीण मासकदेवीद्वारे दिली गेली आहे. ही राजाज्ञा म्हणजे प्रजा कल्याणासाठी मासकदेवी कडक आदेशानुसार स्वतः हस्तक्षेप करताना दिसते. यावरून शासन करणारे आणि प्रजा यांच्यामध्ये प्रेम आणि आपलेपणाची भावना होती. सामान्य प्रजेविषयी कळकळ होती. मासकदेवीच्या महान कार्याचा पुरावा लेखात प्रस्तुत असूनही म्हणावे तसे महत्त्व मासकदेवीला दिले गेले नाही याबद्दल इतिहासकारांना खेद वाटतो.
स्री स्वातंत्र्य आणि स्वायत्तता याविषयी मासकदेवी यांच्या कार्याचे महत्त्व शिलालेखावरून समजून घेणे गरजेचे आहे. नाहीतर तिने शेतकर्यांसाठी केलेले महत्त्वपूर्ण कार्य लक्षात येणार नाही.
महासभेतील पंचायत समूहामध्ये प्रत्यक्ष बसून मासकदेवी शेतकर्यांच्या समस्या ऐकून घेत असे. ठिकठिकाणी शेतकरी पंचायतीमध्ये जाऊन आपल्या समस्या मासकदेवीसमोर मोकळेपणाने मांडत असत. ही पद्धत म्हणजे वैदिक काळातील गणराज्याच्या परंपरेपर्यंत घेऊन जाते. गणतंत्र संस्थेत प्रत्यक्ष जनतेचा ज्याप्रमाणे राज्याच्या राज्यकारभारातील विचारविनिमय, धार्मिक कार्य आणि सैन्य व्यवस्था याबाबत निर्णयात प्रत्यक्ष सहभाग होता त्याप्रमाणेच मासकदेवीच्या कार्यकाळात राज्यातील प्रजाजनांचा प्रत्यक्ष सहभाग होता. मासकदेवीच्या शिलालेखात उल्लेख केलेल्या पाच महासभांचा व्यापक अर्थ आहे. नाग काळातील राज्यकारभारातील पाच महासभा म्हणजे पाच प्रधान होत. यामध्ये प्रमुख प्रधान, परराष्ट्र प्रधान, युवराज, पुरोहित आणि सेनापती हे असत. याबरोबरच ग्रामीण पंचप्रधान यांच्या समूहास महासभा असे म्हटले जायचे. या महासभेला राज्य हिताचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. या महासभेत मासकदेवी हिने स्वतः शेतकर्यांशी बोलून शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले. एवढेच नाही तर घेतलेले निर्णय शिलालेख म्हणून कोरून घेतले. जेणेकरून प्रजा हिताच्या तिच्या आदेशांचे उल्लंघन कोणी करू नये. यावरून मासकदेवीला मिळालेले राज्याधिकार व तिची निर्णयक्षमता लक्षात येते.
राजा सोमेश्वरदेवने अन्य शिलालेखामध्ये मासकदेवीच्या नावाआधी राजभूषण ही उपाधी लिहिलेली आहे. यावरून लक्षात येते की, सोमेश्वरदेव यांनी आपली बहीण मासकदेवी हिला दंतेवाडा विभागाची शासनकर्ती म्हणून नियुक्त केले होते. त्या अधिकारानेच मासकदेवी यांनी वेळोवेळी शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले. मासकदेवी खरोखरच शेतकर्यांच्या समस्येबाबत स्वतः खूप काळजी घेत आणि म्हणून त्या समस्येला दूर करण्यासाठी तिने राजाज्ञा दिली. मासकदेवीच्या या निर्णयावरून स्त्रियांचे स्वातंत्र्य, राज्यकारभारातील तिचे स्थान लक्षात येते. त्याबरोबर हे लक्षात येते की, त्या काळात शेतीवर कर वसूल करण्याबाबत आधी व्यवस्थित नियम नव्हते. राज्यातील अधिकारी करवसुलीत मनमानी करत असत. शेतीवरील करवसुलीच्या काळात मासकदेवीने नियमितपणा व सुसूत्रता आणली. तिच्या कार्यावरून असे लक्षात येते की, स्री एक चांगली प्रशासक होऊ शकते.