तरुणांचा देश अशी भारताची जगात ओळख आहे. याच युवापिढीच्या बळावर विश्वगुरु आणि जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न देशाने पाहिले आहे. तथापि तारुण्याच्या उंबरठ्यावरील पिढीच्या विश्वात भयंकर उलथापालथ सुरु असून गुंडागर्दी आणि तथाकथित भाईगिरीचे आकर्षण वाढत असल्याची भीती वाटावी अशा घटना अधूनमधून घडत आहेत. पहिली घटना चिखलीमधील. हातात कोयता घेऊन दहशत माजवली. दोघांवर वार केले. मोबाईल चोरले या आरोपाखाली पोलिसांनी अल्पवयीन मुलांना अटक केली.
दुसरी घटना कानपूरची. दोन वर्गमित्रांचे भांडण झाले. रागात एका मित्राने दुसऱ्या मित्राचा वर्गातच खून केला. आरोपी विद्यार्थी दप्तरात चाकू घेऊन आला होता असे पोलिसांनी सांगितले. तिसऱ्या घटनेत भुसावळमधील अकलूद येथील शाळेत एका विद्यार्थाच्या दप्तरात शिक्षकांना गावठी कट्टा सापडला होता. उत्तरप्रदेशातही अशीच एक घटना नुकतीच घडली. गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. ही गंभीर समस्या आहे. अडनिड्या वयातील मुलांमध्ये भाईगिरीचे आकर्षण का वाढत असावे? हातातील शस्त्र म्हणजेच ताकद आणि अशा मुलांना नेता म्हणून त्यांच्याच वयाच्या मुलांकडून मान्यता मिळते हा समज कसा पसरला? अभ्यास करून मोठे होण्याचे स्वप्न बघण्याच्या वयात मुले वर्गात गावठी कट्टा आणि चाकू घेऊन येण्याचे धाडस कसे करू शकतात? या समस्येचा बहुआयामी विचार करायला हवा. समाजमाध्यमे मुलांच्या खिशात मावतात. त्यांच्या वापराने स्वातंत्र्याची आणि खासगीपणाची चुकीची व्याख्या रूढ केली. समाजमान्य नसलेल्या गोष्टींना ग्लोरिफाय करणारा मजकूर आणि गुंडागर्दी हीच हिरोगिरी असा समज दृढ करणारा मजकुर समाजमाध्यमांवर धोधो पडत असतो.
अश्लीलतेचे खुलेआम प्रदर्शन केले जाते. काय पाहायचे हे ज्याचे त्याने ठरवायला हवे असे यावर म्हटले जाईल. तथापि अत्यंत संवेदनशील वयात मुलांना अशा अनेक गोष्टींचे आकर्षण वाटू शकते. समाजमाध्यमांवरील मजकुराचा व व्हिडिओचा विपरीत परिणाम मुलांच्या मनावर होतो हा अनेक सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. मुलांचे पालकही आत्मचिंतन करतील का? मुलांचे दोन्ही पालक व्यस्त असतात. उदरनिर्वाहाच्या जबाब्दारीपोटी ते दोघेही दिवसाचा बराच काळ घराबाहेर असतात. त्याच वेळेत मुले घरी एकटी असतात. त्यांचा आणि मुलांचा संवाद हरवला आहे. ती पोकळी समाजमाध्यमे, ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा मित्र भरून काढतात. त्यांचाच पगडा मुलांच्या मनावर बसतो. मुलांचे वर्तन बदलले तरी ते किती पालकांच्या लक्षात येते? तेवढा वेळ मुले आणि पालक एकमेकांना देतात का? शाळांमध्येही मूल्यशिक्षण फक्त एका तासापुरते मर्यादीत झाले आहे. अनेक प्रकारच्या बोज्यामुळे शिक्षकांना शिकवण्यास वेळ मिळत नाही. त्यांना शिकवू दयावे असे अभियान शिक्षकांनी मध्यंतरी राबवले. पठडीबद्ध अभ्यास घेण्यासच वेळ मिळत नसेल तर मुलांमधील वर्तनदोष शिक्षकांच्या लक्षात तरी कधी येणार? मुलांना क्रोध अनावर होतो. त्याचे नियमन शिकवले जाते का? क्रोध निर्माणच होऊ नये यासाठी देखील प्रयत्न व्हायला हवेत. या सामाजिक समस्येचा जाणत्यांनी समग्र विचार करून उपाययोजना सुचवायला हवी. तसे झाले नाही तर उभरत्या पिढीच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका नाकारता येणार नाही.