नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी भारताला धमकी देतानाच स्वताःची खिल्लीदेखील उडवून घेतली आहे. मुनीर यांनी भारताची तुलना लखलखत्या मर्सिडीज कारशी केली आहे. तर पाकिस्तानला त्यांनी भंगार वाहून नेणाऱ्या ट्रकची उपमा दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते ट्रोल झाले आहे. पण यासोबतच त्यांनी भारताला धमकीदेखील दिली आहे. भारत म्हणजे एक चमचमणारी मर्सिडीज आहे. तसेच पाकिस्तानची तुलना ‘डंप ट्रक’ अशी केली आहे. तसेच या दोन्ही वाहनांची धडक झाली तर कोणाचे नुकसान होईल? असा सवाल असीम मुनीर यांनी केला.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख तथा फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी भारताला पुन्हा एकदा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. तसेच यावेळी बोलताना असीम मुनीर यांनी केलेल्या आणखी एका विधानाची मोठी चर्चा रंगली आहे. स्वत:च्या देशाची तुलना ‘डंप ट्रक’ अशी केल्याने आणि भारताची तुलना चमकदार मर्सिडीज अशी केल्यामुळे असीम मुनीर हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.
ऑपरेशन सिंदूरसंदर्भात बोलताना असीम मुनीर यांनी अमेरिकेत गरळ ओकली आहे. त्यांनी भारताला बालीश धमकी देताना म्हणाले, जर भारतामुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले, तर पाकिस्तान अर्ध्या जगाला आपल्या सोबत घेऊन बुडेल.
सिंधू जल करारावरून धमकी
मुनीर यांनी सिंधू जल करार मोडणाऱ्या भारताने स्पष्ट शब्दांत धमकी दिली आहे. ‘भारत सिंधू नदीवर धरण बांधेल. आम्ही त्याची वाट पाहात आहोत. भारताने धरण बांधले की आम्ही १० क्षेपणास्त्र डागू. सिंधू नदी भारताची कौटुंबिक मालमत्ता नाहीए. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची अजिबात कमतरता नाही,’ असे मुनीर म्हणाले.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या आसिम मुनीर यांनी भारताला थेट अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली. ‘भारताने पाकिस्तानचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही निम्म्या जगाला सोबत घेऊन बुडू,’ असा इशारा मुनीर यांनी दिला. अमेरिकेच्या जमिनीवरुन कोणत्याही देशाच्या सैन्य प्रमुखानं तिसऱ्या देशाला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पाकिस्तान भारताचे नुकसान कसे करू शकतो? हे समजावून सांगताना मुनीर म्हणाले, “मी परिस्थिती समजावून सांगण्यासाठी एक साधे उदाहरण देईन. भारत फेरारी प्रमाणे महामार्गावर येणारी एक चकचकीत मर्सिडीज आहे, मात्र, आपण कचरा, विटा आणि दगडांनी भरलेला डंप ट्रक आहोत. जर हा ट्रक त्या कारला धडकला तर कोणाचे नुकसान होईल?”
भारत स्वत:ला विश्वगुरु म्हणून जगासमोर आणू पाहतोय. पण वास्तवात भारत त्यापासून कोसो दूर आहे, असं मुनीर म्हणाले. ‘कॅनडात झालेली शीख नेत्याची हत्या, कतारमध्ये ८ भारतीय नौदल अधिकाऱ्यांना झालेली अटक आणि कुलभूषण जाधव प्रकरण या सगळ्या घटना जागतिक पातळीवर भारताच्या दहशतवादी कारवायांमधील सहभागांची उदाहरणं आहेत,’ असा दावा त्यांनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दरम्यान, मुनीर यांनी जूनमध्ये अमेरिका दौरा केला होता. त्यानंतर ते आता दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. जूनमधील दौऱ्यात मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एका खाजगी स्नेहभोजन कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्या भेटीमुळे अमेरिका-पाकिस्तान सहकार्य वाढविण्याच्या घोषणा झाल्या, ज्यामध्ये तेल कराराचाही समावेश आहे.





