Saturday, July 27, 2024
Homeनगर‘इंडिया’ नावाचा भाजपाने घेतला धसका

‘इंडिया’ नावाचा भाजपाने घेतला धसका

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संविधानाचा अनादर, लोकशाहीची गळचेपी, वाढलेली महागाई व बेरोजगारी याला जबाबदार असलेल्या केंद्रातील भाजपा व राज्यातील महायुती सरकारने आता ‘इंडिया’ नावाचा धसका घेतला आहे. यांच्या सभांना कुणी येत नसल्याने घेतलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम गंमतीदार ठरला आहे. कुठल्याही आंदोलनाला मोडून काढण्याच्या भाजपाच्या भूमिकेने लोकशाहीचा एकप्रकारे गळाच घोटला आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेतून आ. थोरात बोलत होते. ते म्हणाले, भारत जोडो यात्रेने उच्चांक केला. संपूर्ण जगाचे या यात्रेकडे लक्ष होते. कन्याकुमारी ते काश्मिर अशी ही यात्रा पार पडली. देशाच्या विविध प्रश्नांवर चर्चा व्हावी, हा उद्देश या यात्रेचा होता. देशात आज लोकशाहीची गळचेपी होत आहे. राज्यघटनेची मोडतोड होत आहे. बेरोजगारी, महागाई याची जाणीव सरकारला यानिमित्ताने झाली. महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देण्याचे काम भाजपाचे सरकार करत आहे, जनतेचे लक्ष मुख्य विषयांकडे वेधण्याचे काम या यात्रेतून झाले.

मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारने सातत्याने प्रयत्न केले. मात्र नवं सरकार महायुतीचं आलं, त्यांनी मात्र दीड वर्षांत काहीच काम केलं नाही, मराठा समाज संयमी आहे. त्यांना गृहित धरले गेले. अहिंसक पद्धतीने आंदोलन असताना त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. त्यामुळे सर्वांच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या. मणिपूर, शेतकरी आंदोलन, खेळाडूंचे अन्ययाविरुद्धचे आंदोलन हे सर्व आंदोलन भाजपने मोडून काढण्याचा प्रयत्न केला. ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, हीच आमची भूमिका आहे.

सध्या दुष्काळी परिस्थितीला राज्याला समोरे जावे लागत आहे. ऑगस्ट महिना विना पावसाचा गेला. खरीप पिके पूर्णतः गेली आहेत. मोठ्या दुष्काळाला शेतकरी सामोरा जात आहे. आजही काही गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शासन मात्र गंभीर दिसत नाही. पीक विम्याचे पैसे तातडीने दिले पाहिजे.

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले, राज्याच्या 48 जागांवर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल, त्यामध्ये शिर्डीची जागा कुणाला हे निश्चित होईल.

महायुतीचे खरे रुप आता समोर येऊ लागल्याने ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम केला गेला. हा गंमतीदार कार्यक्रम आहे. त्यांच्या सभांना कुणी येत नसल्याने त्यांनी शासकीय यंत्रणेचा वापर करून जनतेला धरून आणून बसवायचे आणि भाषणं करायचे. या कार्यक्रमांसाठी प्रचंड खर्च झाला. या खर्चाची चौकशी झाली पाहिजे. हा कार्यक्रम जनतेसाठी त्रासदायक ठरल्याने जनता त्यांच्या विरोधात गेली आहे. नुसत्या घोषणा करायच्या आणि वास्तविक काहीच करायचे नाही, त्यांच्या घोषणा केवळ निवडणुकांपुरत्याच असल्याचे थोरात म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या