नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान घाबरल्याचे दिसून येत असून, त्यांच्याकडून सीमारेषेवर वारंवार गोळीबार केला जात आहे.
अशातच आता बलुच लिबरेशन आर्मीच्या (Baloch Liberation Army) स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने (STOS) बोलानच्या माच कुंड भागात रिमोट-कंट्रोल आयईडीने मोठा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात पाकिस्तानचे १२ सैनिक ठार झाले असून, या स्फोटाची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे.
https://twitter.com/AdityaRajKaul/status/1920255026733212126
दरम्यान, मंगळवारी हा हल्ला (Attack) करण्यात आला असून, या हल्ल्याचे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच फुटेजमध्ये असे दिसून आले की, स्फोटानंतर वाहनात बसलेले सैनिक अनेक मीटर हवेत उडाले. तसेच सैनिकांच्या चिंधड्या-चिंधड्या उडाल्याचे दिसत आहे.
पाकिस्तान काय म्हणाले?
या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून सांगण्यात आले की,”बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी माच क्षेत्रात सुरक्षापथकाची एक गाडी स्फोटात उडवून दिली. या हल्ल्यात सात सैनिक ठार झाले असून, दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी या भागात शोधमोहिम सुरु आहे.
पाकच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद
ऑपरेशन सिंदूरमुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानी सैन्याने बुधवारी सकाळपासून पुंछ जिल्ह्यात जोरदार गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे जवान दिनेश कुमार शर्मा गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु,उपचारावेळी त्यांचे निधन झाले.