नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानी हल्ल्यांना इतके चोख प्रत्युत्तर दिले की पाकिस्तानला भारताची धास्ती भरली आहे. त्याच वेळी, पाकिस्तानी नेत्यांना भारताकडून आणखी हल्ल्यांची भीती वाटू लागली आहे. ऑपरेशन सिंदुर अंतर्गत भारताने पाकिस्तानात घुसून पाकिस्तानी हवाई तळांचे मोठे नुकसान केले तसेच त्यांच्या अनेक सैनिकांचे मृत्यू झाले. तसेच पिओके आणि अन्य भागातील १०० दहशतवादी ठार झाले आहे. त्यामुळे पाकिस्ताने भारतासोबत शस्त्रसंधी केली. पण अजूनही पाकिस्तानला भारताची भिती वाटत आहे. भारत केव्हाही आपल्यावर हल्ला करू शकतो असे पाकिस्तानला वाटत आहे. पाकिस्तानच्या एका बड्या नेत्यानेच ही भीती व्यक्त केली आहे.
पाकिस्तानची वृत्तवाहिनी ‘समा टीव्ही’च्या एका कार्यक्रमात, अवामी मुस्लिम लीग (एएमएल) चे प्रमुख आणि माजी मंत्री नदीम मलिक म्हणाले, “मे महिना हा एक महत्त्वाचा महिना असेल. विशेषतः पुढील १७ दिवस, कारण युद्धविरामाची घोषणा होऊनही तणाव खूप जास्त आहे. १७ दिवसांत भारत पुन्हा पाकिस्तानचे टेन्शन वाढवू शकतो आणि हल्ला करू शकतो. कारण युद्ध अजून संपलेले नाही. तणाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानने सतर्क आणि सावध राहिले पाहिजे.”
मलिक यांनी यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला की पाकिस्तानने लढाईत पाचपेक्षा जास्त भारतीय विमाने पाडली आहेत आणि युद्ध संपलेले नाही, फक्त युद्धविराम लागू आहे. पाकिस्तानी नेत्यांमध्ये भारताच्या हल्ल्याची भीती ही नवीन गोष्ट नाही. पहलगाम हल्ल्यानंतर, पाकिस्तान दोन आठवडे भीतीच्या छायेत राहिला आणि ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून ही भीती खरी ठरवली. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.
त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाइलने हल्ला केला. त्यानंतर भारतानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाइल हल्ले परतवून लावले. सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी लागू आहे. पण तरीही पाकिस्तानी नेते आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा