नवी दिल्ली | New Delhi
भारताने (India) बुधवार (दि. ७ मे) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानात (Pakistan) घुसून एअर स्ट्राइक केला. त्यामध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. यानंतर काल रात्री पाकिस्तानने भारताच्या १५ सैन्य ठिकाणांवर मोठा हल्ला (Attack) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्यदलाने त्यांचा हा प्रयत्न एस ४०० ने हाणून पाडला.
पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारताने पहिल्यांदाच एस ४०० (S 400) हे आपले सुदर्शन चक्र वापरले. एस -४०० ही भारताची मजबूत एअर डिफेन्स सिस्टिम आहे. या सिस्टिमने पाकिस्तानकडून येणार मिसाइल्स, ड्रोन्स पाडले. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपुर, बठिंडा, चंडीगढ़, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सारख्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व हल्ले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने परतून लावले.
दरम्यान, पाकिस्तानने काल भारतातील १५ शहरांमध्ये हल्ला (Attack) करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कराने आज पाकिस्तानातील १२ शहरांमध्ये ५० ड्रोन हल्ले करत चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांमधील एअर डिफेन्स सिस्टीम देखील उद्ध्वस्त करण्यात आली. याशिवाय पाकिस्तानच्या लष्कराने अणुबॉम्ब ठेवलेल्या शहरांतही भारताने ड्रोन हल्ले (Drone Attack) केले.
एस ४०० डिफेन्स सिस्टीम नेमकी काय आहे?
एस ४०० ही एक अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम आहे. ही सिस्टीम रशियाच्या एलमाज सेंट्रल डिझाइन ब्यूरोने विकसित केली आहे. या सिस्टीमद्वारे ४०० किलोमीटर अंतरावरूनच शत्रूच्या हालचाली टिपता येऊ शकतात. पलटवार करण्यात ही प्रणाली अतिशय तरबेज आहे. मिसाइल, ड्रोन, फायटर जेट्स आणि रॉकेट लाँचर यांच्या मदतीने होणारे हवाई हल्ले रोखण्यात ही यंत्रणा अतिशय अचूक आहे. ही एक मोबाइल सिस्टीम असून, रस्ता मार्गे या यंत्रणेला कुठेही घेऊन जाता येऊ शकते. फक्त पाच ते दहा मिनिटांत या सिस्टिमला ऑपरेशनसाठी तयार केले जाऊ शकते.
एस ४०० चे वैशिष्ट्ये काय?
एस ४००सिस्टीम ४०० किलोमीटरवरील टार्गेट डिटेक्ट करून त्याला नष्ट करू शकते. 92N6E नावाचे रडार यात आहे. या रडारच्या मदतीने ६०० किलोमीटर अंतरावरील मल्टिपल टार्गेट्स शोधले जाऊ शकतात. इतकेच नव्हे तर एकाच वेळी १६० टार्गेट्स ट्रॅक केले जाऊ शकतात. एका टार्गेटवर दोन मिसाइलने हल्ला केला जाऊ शकतो. ३० किलोमीटरच्या उंचीवरील टार्गेटलाही या यंत्रणेच्या मदतीने सहज टिपता येऊ शकते.