मुंबई |Mumbai
२२ एप्रिलला काश्मीरमधील पहलगाम या पर्यटन स्थळावर दोन अतिरेक्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यास सुरवात केली आहे. भारताने पाकिस्तानविरोधात मोठ्या आणि निर्णायक लष्करी युध्दाची तयारी सुरु केली असून त्याची सुरुवात ७ मे रोजी होणार आहे. देशभरातील २४४ ठिकाणी युद्धा दरम्यानचे मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. आज केंद्रीय गृहसचिवांची राज्यांच्या गृह सचिवांसोबतची बैठक पार पडली. या बैठकीत उद्या ७ मे रोजी होणाऱ्या मॉक ड्रील होणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे. राज्यात १६ ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे.
केंद्र सरकारने उद्या ७ मे रोजी देशातील विविध राज्यांमध्ये मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर आता राज्यांमध्ये मॉक ड्रीलची तयारी सुरु करण्यात आली आहे. या मॉक ड्रीलची वेळ जरी निश्चित करण्यात आली नसली तरी यासाठीची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशांच्या विमानांनी हल्ला केल्यास काय करावे, काय करू नये, याची माहिती दिली जाते. आणीबाणीच्या स्थितीत लोकांनी आपली काळजी घेण्यासह इतरांना कशी मदत करता येईल, याचे प्रशिक्षण मॉक ड्रिलमध्ये करण्यात येते.
नागरी सुरक्षा दलाच्या बैठकीत महाराष्ट्रातील मॉक ड्रीलबाबत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, मुंबई, उरण –जेएनपीटी, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांमध्ये युद्धाचा सराव घेण्यात येणार आहे. त्याशिवाय, थळ–वायशेत, रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड आणि सिन्नर या भागामध्ये मॉक ड्रील होईल.तसेच, पिंपरी – चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातही मॉक ड्रील होणार आहे.
केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ७ मे ला देशभरात मॉक ड्रिल करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहे. संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय आहे. एअर रेड सायरन्सची चाचणी केली जाणार आहे. सर्वसामान्य, विद्यार्थ्यांना संरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मॉक ड्रिलमध्ये घेतल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आली आहे. सरकारकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे मॉक ड्रील?
राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना सुरक्षा नीती आणि नागरिक सुरक्षा उपयासंदर्भात जागरुक करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. यासंदर्भात नागरिक सुरक्षा अधिनियम कायदा 1968 मध्ये संसदेत संमत करण्यात आला होता. हा कायदा संपूर्ण देशात लागू आहे.
नागरी संरक्षणाची उद्दिष्टे म्हणजे लोकांचे जीव वाचवणे, मालमत्तेचे नुकसान कमीत कमी करणे हे आहे. तसेच लोकांचे मनोबल उंचावणे आहे. युद्ध आणि आणीबाणीच्या काळात नागरी संरक्षण संघटना महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यामध्ये ते अंतर्गत भागांचे संरक्षण करतात. सशस्त्रदलांना मदत करतात.
कसे वाजतात युध्दाचे सायरन?
आपातकालीन परिस्थितीत सायरन वाजवले जातात. या सायरनचा आवाज खूप मोठा असतो. दोन ते पाच किलोमीटरपर्यंत त्याच्या आवाजाची रेंज असते. १२०-१४० डेसिबलपर्यंत त्याचा आवाज असतो. त्या आवाजात एक सायक्लिक पॅटर्न असतो. आवाज हळूहळू वाढतो त्यानंतर कमी होत असतो.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा