नवी दिल्ली | New Delhi
भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan War) तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने काल (शनिवारी) सायंकाळी युद्धबंदी जाहीर केली. मात्र, युद्धबंदीनंतरही भारताचे ऑपरेशन सिंदूर (Opration Sindhoor) सुरु असल्याचे हवाई दलाकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शस्त्रसंधीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज (रविवारी) तीन महत्वाच्या बैठका झाल्या. यावेळी मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सैन्याचे प्रमुख देखील उपस्थित होते. तसेच रॉ आणि आयबीचे प्रमुखही होते. या बैठकीत शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर पाकिस्तानकडून झालेले हल्ले, शस्त्रसंधीचे झालेले उल्लंघन याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
हवाई दलाने (Air Force) त्यांच्या सोशल मीडिया (Social Media) हँडल एक्सवर म्हटले की, “भारतीय हवाई दलाने (IAF) ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नेमून दिलेली सर्व कामे अचूकतेने आणि जबाबदारीने यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. ही कारवाई देशाच्या हिताच्या अनुषंगाने विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक पार पाडण्यात आली. ही कारवाई अजूनही सुरू असल्याने त्याची संपूर्ण माहिती लवकरच दिली जाईल. लोकांना कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये”, असे हवाई दल म्हणाले आहे.
#OperationSindoor | Indian Air Force tweets, "…Since the Operations are still ongoing, a detailed briefing will be conducted in due course. The IAF urges all to refrain from speculation and dissemination of unverified information." pic.twitter.com/tRSoEEZj8t
— ANI (@ANI) May 11, 2025
दरम्यान, भारताने (India) ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारताच्या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले असून, त्यात काही मोस्ट वॉटेंड दहशतवादी देखील आहेत. तसेच दहशतवाद्यांची ९ तळ उद्ध्वस्त केली असून, भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात (Pakistan) ही कारवाई केली.
शस्त्रसंधी केल्यानंतरही पाकिस्तानकडून गोळीबार
भारतासोबत शस्त्रसंधी केल्यानंतर अवघ्या तीन तासांत सीमेवर गोळीबार करत, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पुन्हा एकदा सीमेलगतच्या चार राज्यांमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाहायला मिळाले. मात्र, त्यांचा हा हल्ला भारतीय सेनेने परतवून लावला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पाकच्या हालचालींवर नजर असून, सेनेला कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची माहिती दिली आहे.