नवी दिल्ली | New Delhi
जम्मू -काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या विरोधात भारताने पुकारलेले ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. तसेच दोन्ही देशांकडून हल्ले प्रतिहल्ले सुरु होते. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य पारीस्थिती निर्माण झाली होती. अखेर या युद्धजन्य पारीस्थितीला आज (शनिवारी) पूर्णविराम मिळाला आहे. याबाबत आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली होती. त्यानंतर लगेचच भारत सरकारचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृतपणे घोषणा केली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, “पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी ३:३५ वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार ५ वाजेपासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र असा सर्वप्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज, या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी ऑपरेशन्स महासंचालक १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील”, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे, सध्या तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
"Pakistan's DGMO called Indian DGMO at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land, in the air & sea with effect from 1700 hours IST. Instructions have been given on both sides to give effect to… https://t.co/rEhleUtOXq pic.twitter.com/zUhZ3X0R0g
— ANI (@ANI) May 10, 2025
डोनाल्ड ट्रम्प पोस्टमध्ये काय म्हणाले?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ वाटाघाटींनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांचे अभिनंदन”, असे त्यांनी म्हटले.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार म्हणाले की,”पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ शस्त्रसंधीवर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच त्यांच्या सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता, या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत”, असे त्यांनी म्हटले.