सार्वमत
नवी दिल्ली – देशातील दहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासांत एकही नवा करोना रुग्ण सापडला नसल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितले. दरम्यान 2,109 मृत्यूसह देशातील करोनाग्रस्तांची संख्या 63 हजारांच्या घरात पोहोचली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी पुन्हा 12 दिवसांवर गेला आहे. करोनाचे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 30 पेक्षाही जास्त झाली आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
करोनाचा मृत्युदर देशात 3.3 टक्के आहे, अन्य देशांच्या तुलनेत हा खूप कमी आहे. सिक्कीम, नागालॅण्ड आणि लक्षद्वीपसह चार राज्यांत आतापर्यंत नवा करोनाबाधित सापडला नाही. गोवा, मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान निकोबार या राज्यात करोनाचा एकही सक्रिय रुग्ण नाही, असे ते म्हणाले.
देशात 4,362 विशेष कोविड रुग्णालये स्थापन करण्यात आली असून, याठिकाणी हलक्या लक्षणाच्या साडेतीन लाख रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था आहे. केंद्र सरकारने विविध राज्यांना 36 लाख पर्सनल प्रोटेक्शन इक्विपेमेंट (पीपीई) कीटचा, तर 72 लाख एन-95 मास्कचा पुरवठा केला आहे, असे त्यांनी सांगितले.