दिल्ली l Delhi
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्विन्सलँडच्या ब्रिस्बेन येथील द गाब्बा येथे सुरू असलेल्या चौथे आणि शेवटच्या कसोटी सामन्यात चांगलीच रंगात आली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३६९ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद २९४ धावा केल्या तर
भारताने पहिल्या डावात सर्बवाद ३३६ आणि दुसऱ्या डावात बिनबाद ४ धावा केल्या आहेत. पावसामुळे तिसऱ्या दिवसाप्रमाणेच चौथ्या दिवशीही खेळ लवकर थांबवण्यात आला. आता शेवटच्या दिवशी ३२४ धावा करुन विजय मिळवणे अथवा सामना अनिर्णित राखण्यासाठी बचावात्मक खेळणे हे दोन पर्याय भारताकडे आहेत. याउलट भारताला लवकर बाद करुन सामना जिंकणे हे एकच लक्ष्य घेऊन ऑस्ट्रेलिया खेळणार आहे.
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं आक्रमक फलंदाजी करत खोऱ्यानं धावा काढल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांनी तुफानी फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. वॉर्नर-हॅरिस यांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागिदारी केली.बॉर्डर गावसकर चषकातील ही पहिल्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागिदारी ठरली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव स्मिथनं सर्वाधिक ५५ धावा काढल्या. त्याव्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नर (४८), हॅरिस (३८), लाबुशेन (२५), कॅमरुन ग्रीन(३७) आणि कर्णधार पेन (२७) यांनी झटपट धावा केल्या आहेत.
भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरनं प्रभावी गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजनं पाच बळी मिळवले तर शार्दुल ठाकूरनं ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांन तंबूत धाडलं. अष्टपैलू संदुरला एक बळी मिळाला. गाबाच्या मैदानावर आतापर्यंत चौथ्या डावात २५० पेक्षा जास्त धावांचं आव्हान एकदाही कोणत्याही संघाला पार करता आलं नाही. शिवाय, मागील १०० वर्षात या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत एकदाही पराभव झाला नाही. त्यामुळे ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावरील हा रेकॉर्ड भारतीय संघ मोडणार का? याकडे क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे.