नवी दिल्ली | New Delhi
कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची हत्या (Hardip Singh Nijjar Murder) पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने (ISI) केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निज्जरच्या जवळ जाणे त्याच्या ओळखीच्या व्यक्तीशिवाय अशक्य होते. भारताला बॅकफूटवर आणण्यासाठी आयएसआय निज्जरला संपवू इच्छित असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. राहत राव आणि तारिक कियानी हे कॅनडातील दोन आयएसआय एजंट आहेत जे पाकिस्तानी एजन्सीसाठी काम करत आहेत.
राहत राव आणि तारिक कियानी हे आयएसआयला परदेशामधून दहशतवादी कायरवायांचं नियोजन करण्यास मदत करतात. भारतात मोस्ट वॉण्टेड असणाऱ्या दहशतवाद्यांसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय आणि नियोजन करण्यात राहत राव आणि तारिक कियानीचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायिक कारणांमुळे तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांकडून अधिक खंडणी वसूल करण्यासाठी राहत राव आणि तारिक कियानी हे निज्जरच्या हत्येच्या कटात सहभागी झाले असावेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला निज्जरच्या जवळपास जाणे शक्यच नव्हते असे सूत्रांचे म्हणणे आहे. निज्जर हा संभाव्य हल्ल्याच्या भीतीने फार सक्रीय आणि सतर्क राहायचा. त्यामुळे एखाद्या ओळखीतल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय त्याची गोळ्या झाडून हत्या करणे शक्य नसल्याचे भारतीय सूत्रांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेजर जनरलपासून हवालदारापर्यंत अनेक माजी आयएसआय अधिकारी हरदीप सिंह निज्जरच्या शेजारी राहतात. राव आणि कयानी यांचे स्थानिक ड्रग्ज व्यवसायावर थेट नियंत्रण राहावे म्हणून निज्जरची हत्या करण्याचे काम यापैकी एकाला देण्यात आले असावे,अशी माहिती समोर आली आहे.
निज्जर कालांतराने शक्तिशाली होत आहेत आणि स्थानिक कॅनेडियन समुदायातही त्यांची लोकप्रियता वाढत होती. राहत राव, तारिक कियानी आणि फुटीरतावादी नेता गुरचरण पुनुन हे ड्रग्ज आणि इमिग्रेशन व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ऑपरेशनमध्ये सामील होते,यातुन तो पैसा मिळवत होता. हरदीपसिंह निज्जरची पाकिस्तानस्थित वाधवा सिंह आणि रणजित सिंह नीता यांसारख्या समुदायातील नेत्यांशी जवळीक आणि संबंधही आयएसआयसाठी अडचण होती.