नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने अनेक धोरणात्मक पाऊले उचलली आहेत. तसेच, भारतीय लष्कराने (Indian Army) युद्धाभ्यास सुरू केल्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे.
पहलगाम हल्ला झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल हवाई दल प्रमुखांशी ४० मिनिटे चर्चा केली होती. त्यानंतर आज थेट संरक्षण सचिव राजेश कुमार यांच्यासोबत मोदींची बैठक सुरू आहे. या बैठकीला हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. काही वेळा पूर्वी हे अधिकारी पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडले आहेत. मात्र, संरक्षण सचिवांशी अजूनही चर्चाच सुरू असल्याने या बैठकीत मोठा निर्णय होणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलासह (Indian Air Force) तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत २९ एप्रिलला उच्चस्तरीय बैठक घेतली होती.यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आदी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलांना योग्य वेळ, ठिकाण आणि पद्धत आदींची निवड करण्याची मोकळीक दिली होती.