Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाभारत स्कॉटलंड निर्णायक सामना आज

भारत स्कॉटलंड निर्णायक सामना आज

दुबई | Dubai

आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) २०२१ सुपर १२ मध्ये पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) स्वीकारलेल्या दारुण पराभवानंतर अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) ६६ धावांनी दणदणीत विजय मिळवून भारतीय संघाला विजयाची चव अखेर चाखायला मिळाली आहे….

- Advertisement -

आज दुबईमध्ये भारतीय संघाचा सामना स्कॉटलंडविरुद्ध (Scotland) होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवण्यासाठी विराटसेना आज मैदानात उतरणार आहे.

मात्र भारताला आपली धावगती अधिक सुधारण्याची गरज आहे . शिवाय न्यूझीलंड संघाचे अजून दोन सामने शिल्लक आहेत यात एका सामन्यात न्यूझीलंड पराभूत झाल्यास भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल. शिवाय भारत आणि स्कॉटलंड संघांमध्ये प्रथमच टी २० सामना खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान संघांमध्ये अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणी गोलंदाजी बहरली होती. आता स्कॉटलंडविरुद्ध कामगिरीत सातत्य राखण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. मात्र स्कॉटलंडविरुद्ध एक गाफील राहण्याची चूक भारताला महागात पडू शकते.

स्कॉटलंड संघाने न्यूझीलंडविरुद्ध १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १६ धावांनी सामना जरी गमावला असला. तरी त्यांनी न्यूझीलंड संघाला विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत कडवी झुंज दिली होती. या गोष्टीपासून भारतीय संघाला सावध राहावे लागेल. सुपर १२ मध्ये ४ सामन्यांमध्ये एकच विजय मिळवू शकलेला स्कॉटलंड विजयी शेवट करण्यासाठी सज्ज आहे. शिवाय नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरू शकतो.

दुसरीकडे शारजाह मैदानावर साडेतीन वाजेपासून नामिबिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला जात आहे. न्युझीलंडने निर्धारित २० षटकांत चार गडी गमावत १६४ धावांचे लक्ष ठेवले आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीतील आपलं स्थान जवळपास निश्चित करण्यासाठी न्यूझीलंड सज्ज आहे .

तर नामिबिया विजयी झाल्यास भारतासाठी उपांत्य फेरी गाठण्याची सुवर्णसंधी असणार आहे. दोन्ही संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास न्यूझीलंड संघ नामिबिया संघाच्या तुलनेत अधिक संतुलित दिसत आहे. नामिबिया न्यूझीलंडला रोखण्यात कितपत यशस्वी ठरतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

सलिल परांजपे नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या