आशिया चषक २०२५ चा अंतिम सामना आज भारत विरुद्ध पाकिस्तानच्या क्रिकेट संघात दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळण्यात आला. चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानने सर्व गडी बाद १४६ धावांचे लक्ष भारतीय संघापुढे दिले. तिलक वर्माच्या नाबाद ६९ धावा व शिवम दुबेची सावध फलंदाजी; त्याचबरोबर रिंकू सिंगच्या विजयी चौकारने भारतीय संघास विजय मिळवून दिला. भारतीय संघाने क्रिकेटच्या आशिया चषक २०२५ वर आपले नाव कोरले.
नाणेफेक जिंकून भारतीय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पाकिस्तानच्या संघाकडून एस फरहान व फखर झमान सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या १० व्या षटकात वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने एस फरहानला झेल बाद करत पाकिस्तानच्या संघाला पहिला धक्का दिला.एस फरहानने ३८ चेंडूत ५७ धावा केल्या. १३ व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर जसप्रीत बुमराहने सैम अयुबला १४ धावांवर झेल बाद करत तंबूत पाठविले. १४ व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर रिंकू सिंघ्ने मोहमद हॅरीसला शून्य धावसंख्येवर झेल बाद करत पाकिस्तानच्या संघास तिसरा धक्का दिला.
तिसरा गडी बाद झाल्या नंतर पाकिस्तानच्या संघाच्या फलंदाजांची बाद होण्याची मालिका सुरु झाली. १५ व्या षटकात वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर कुलदीप यादवने सलामीला आलेल्या फखर झमानला झेल बाद केले. फखर झमानने ३५ चेंडूत ४६ धावा केल्या.१६ व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने हुसेन तलतला १ धावसंख्येवर झेल बाद केले. १७ व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने सलमान आगाला ८ धावांवर झेल बाद केले.पाठोपाठ कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर शाहीन आफ्रिदी शून्य धावसंख्येवर पायचीतझाला.तर फहीम अश्रफला तिलक वर्माने शून्य धाव संख्येवर झेल बाद करत तंबूत पाठविले.१८ व्या षटकात जसप्रीत बुमराहने हॅरीस रौफला ६ धावसंख्येवर क्लीन बोल्ड केले. शेवटच्या षटकात खेळाडू अब्रार अहमदने १ धावसंख्येवर समाधान मानले. २० व्या षटकाअखेर पाच चेंडू शिल्लक ठेऊन पाकिस्तानच्या संघाने सर्व गडी बाद १४६ धावा केल्या.
भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा व शुभमन गिल सलामीस फलंदाजीस आले.सामन्याच्या दुसऱ्या षटकात फहीम अश्रफच्या गोलंदाजीवर हॅरीस रौफने अभिषेक शर्माला झेल बाद केले. अभिषेक शर्माने ६ चेंडूत ५ धावा केल्या. तिसऱ्या षटकात शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर सलमान आघाने सुर्यकुमार यादवला १ धाव संख्येवर झेल बाद केले.४थ्या षटका अखेरीस फहीम अश्रफच्या गोलंदाजीवर हॅरीस रौफ करवी शुभमन गिलला झेल बाद झाला.शुभमन गिलने १० चेंडूत १२ धावा केल्या. 13व्या षटकातअब्रार अहमदच्या गोलंदाजीवर एस फरहानने संजू सॅमसनला झेल बाद केले. संजू सॅमसनने २१ चेंडूत २४ धावा केल्या. अटीतटीच्या १९ व्या षटकात शाहीन आफ्रिदी करवी शिवम दुबे ३३ धावांवर झेल बाद झाला. अखेरच्या षटकात रिंकू सिंगने विजयी चौकार लगावत भारतीय संघास विजय प्राप्त करून दिला.





