नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताविरुध्द केलेल्या वक्तव्याचा भारताने चांगलाच समाचार घेतला आहे. शुक्रवारी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघात पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा मांडला. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतात इस्लामोफोबिया वाढल्याचे सांगितले तसेज जम्मू – काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली. शहबाज शरीफ यांचे हे वक्तव्य हास्यास्पद असल्याच भारताने म्हटले आहे. भारतीय डिप्लोमॅट भाविका मंगलनंदन यांनी UNGA मध्ये उत्तर देण्याचा अधिकार वापरत पाकिस्तानी पंतप्रधानांना चोख प्रत्युत्तर दिली आहे.
भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलानंदन म्हणाल्या की, जो देश लष्कराकडून चालविला जातो. ज्यांना जागतिक पातळीवर दहशतवाद, अंमली पदार्थांचा व्यापार आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीसाठी ओळखले जाते, त्या देशाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचे धाडस केले आहे.
भाविका मंगलानंदन पुढे म्हणाल्या की, “दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश अशी पाकिस्तानची जागतिक प्रतिमा आहे. पाकिस्तान शेजाऱ्यांविरोधात दहशतवादाचा शस्त्रासारखा वापर करतो” असे भाविका मंगलनंदन UNGA मध्ये पाकिस्तानला उत्तर देताना म्हणाल्या. त्यांनी आमच्या संसदेवर, आर्थिक राजधानी मुंबईवर, बाजार आणि तीर्थयात्रेच्या मार्गावर हल्ले केले. ही यादी बरीच मोठी आहे. अशा देशाने हिंसाचारावर बोलणे म्हणजे यापेक्षा मोठे दांभिकतेचे उदाहरण असू शकत नाही.”
भाविका मंगलानंदन यांनी शाहबाज शरीफ यांच्यावर टीका करताना असे ही म्हंटले की, खरे सांगायचे तर पाकिस्तानला भारतीय भूभाग बळकविण्याची इच्छा आहे. त्यामुळेच भारताचा विभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने होत असलेल्या निवडणुकांमध्ये दहशतवादाचा वापर करून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानने १९७१ साली नरसंहार केला. दीर्घकाळ अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनच आदिरातिथ्य करत होता असे भाविका मंगलानंदन म्हणाल्या. दहशतवादाबरोबर कुठलीही तडजोड होऊ शकत नाही, हे भाविका मंगलानंदन यांनी स्पष्ट केले. भारताविरुद्ध दहशतवाद पसरवण्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच त्यांनी दिला.
काय म्हणाले शाहबाज शरीफ?
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच दर्जा देणारं आर्टिकल ३७० हटवण्याच्या निर्णयावरही शहबाज यांनी टीका केली. भारताने हा निर्णय मागे घ्यावा व शांततापूर्ण तोडग्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे असे शहबाज शरीफ म्हणाले. पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारतावर इस्लामोफोबिया असल्याचा आरोप केला. भारतात हिंदूवादी एजेंडा हा इस्लामोफोबियाची अभिव्यक्ती आहे. याचा वापर भारतीय मुस्लिमांना लाचार करण्यासाठी केला जात आहे. भारतात इस्लामी वारसा मिटवण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोपही त्यांनी केला.
पॅलेस्टिनी आणि काश्मीरी लोक हे एकसारखेच असल्याचे सांगताना शरीफ म्हणाले की, पॅलेस्टाईनमधील जनता आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांमध्ये काहीही फरक नाही. दोन्हीकडील नागरिक हे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा