Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशभारतानं कॅनडाला ठणकावलं; निवेदन जारी करत दिलं जशास तसं उत्तर

भारतानं कॅनडाला ठणकावलं; निवेदन जारी करत दिलं जशास तसं उत्तर

नवी दिल्ली | New Delhi

कॅनडामध्ये (Canada) जून महिन्यात खलिस्तानी समर्थक (Khalistani) हरदीप सिंग निज्जरची हत्या (HardeepSing Nijjar Murder)झाल्यानंतर त्याचा तपास कॅनडा सरकारने हाती घेतला होता. मात्र, तपासाच्या शेवटी यामध्ये भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करत कॅनडाने देशातील भारताच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांना परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) आज (मंगळवारी) सडेतोड उत्तर दिले आहे.

- Advertisement -

कॅनडाने केलेले आरोप हे आरोप प्रेरित आणि मूर्खपणाचे आहेत असे मंत्रालयाने म्हटले आहे. असे आरोप केवळ त्या खलिस्तानी दहशतवादी आणि कट्टरपंथींपासून लक्ष हटवण्यासाठी आहेत ज्यांना कॅनडात दीर्घकाळ आश्रय देण्यात आला आहे आणि जे भारताच्या प्रादेशिक एकता आणि अखंडतेसाठी सतत धोका आहेत, असेही भारताने पुढे म्हटले आहे.

या विषयावर कॅनडाच्या सरकारची निष्क्रियता ही दीर्घकाळापासून आणि सतत चिंतेची बाब आहे. कॅनडाच्या राजकीय व्यक्तींकडून अशा घटकांबद्दल सहानुभूती उघडपणे व्यक्त केलेली तीव्र चिंतेची बाब असल्याचे देखील भारताने म्हटले आहे.

कॅनडाला भारताची जशास तशी वागणूक! टॉपच्या कॅनडियन अधिकाऱ्याची केली हाकालपट्टी… नेमकं प्रकरण काय?

जस्टीन ट्रुडो काय म्हणाले

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओ यांनी सोमवारी त्यांच्या संसदेत हरदीप सिंग निज्जर प्रकरणावर निवेदन केले. यात “गेल्या काही आठवड्यांपासून कॅनडाच्या तपास यंत्रणा या प्रकरणातील भारताच्या सहभागाचा सखोल तपास करत होत्या”, असेही नमूद केले आहे. “आम्ही कोणत्याही प्रकारचा विदेशी हस्तक्षेप सहन करणार नसून आमच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करू” असे म्हणत भारताच्या उच्चायुक्तांवर कारवाई केल्याची माहिती कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी माध्यमांना दिली.

भारताने भुमिका केली स्पष्ट

दरम्यान, या कारवाईनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने परखड शब्दांत कॅनडाला ठणकावले आहे. “भारत कॅनडाकडून लावण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करतो. आम्ही कॅनडाचे पंतप्रधान व परराष्ट्रमंत्र्यांचं त्यांच्या संसदेतले निवेदन पाहिले आहे. याच प्रकारचे आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोलून दाखवले होते. मात्र, तेव्हाही आम्ही ते पूर्णपणे फेटाळले होते”, असे परराष्ट्र मंत्रालयाने काढलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याची जून महिन्यात कॅनडाच्या सरे शहरात हत्या करण्यात आली. एका पार्किंगमध्ये त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांमध्ये पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. याआधीही या प्रकरणावरून कॅनडाने भारताकडे आपली नाराजी बोलून दाखवली होती.

निज्जर गेल्या वर्षभरात भारतीय तपास यंत्रणांसाठी आणखी मोठी डोकेदुखी बनला होता कारण त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कार्यकर्त्यांना परदेशात रसद आणि पैसा पुरवायला सुरुवात केली होती. २०२२ मध्ये पंजाबमधील जालंधर येथील भरसिंगपूर गावात एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) निज्जरवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यापूर्वी एनआयएने भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणात निज्जरविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या