Saturday, May 4, 2024
Homeनगरइंडियन सिमलेस कंपनीत पगारावरून ताणाताणी

इंडियन सिमलेस कंपनीत पगारावरून ताणाताणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचे कारण पुढे करत व्यवस्थापन नवीन वेतन करार करण्यास टाळाटाळ करत आहे. गतवर्षी दिलेले चार हजार रुपये वेतनवाढीचे आश्वासन हवेतच विरले.

- Advertisement -

वेतन करार संपून दोन वर्षे उलटली तरीही नव्याने करार होत नसल्याने एमआयडीसीतील इंडियन सिमलेस कंपनी आणि कामगार संघटनेत पगारवाढीवरून ताणाताणी सुरू आहे. कामगार संघटनांनी कंपनी व्यवस्थापनाला 72 तासांचा अल्टीमेटम दिला असून बुधवारपासून संपाची हाक दिली आहे. एमआयडीसीतील इंडियन सीमलेस कंपनीची तीन युनिट आहेत. स्टील उद्योग निर्मिती करणारी ही कंपनी आहे.

या तिन्ही युनिटच्या कामगारांची गेटमिटिंग रविवारी रात्री झाली. जिल्हा मजदूर सेनेचे अध्यक्ष बाबुशेट टायरवाले यांच्या पुढाकारातून झालेल्या गेट मिटिंगला वसंत सिंग, युनिट अध्यक्ष राजू वाकळे, बाबा कोतकर, किरण घाडगेसह सर्व कामगार व कंत्राटी कामगार उपस्थित होते.

एप्रिल 2019 पासून वेतनवाढीचा करार प्रलंबित आहे. संघटनेने कंपनी व्यवस्थापनाला पत्रव्यवहार करत वेतन करार करण्याची मागणी केली. मार्च 2019 मध्ये कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात व्यवस्थापनाने पगारवाढीसंदर्भात कामगार संघटनेसोबत चर्चा केली. त्यावेळी कामगारांचे नुकसान होऊ देणार नाही. वेतन करार हा एप्रिल 2019 पासून धरला जाईल असे आश्वासन दिले. पुढे कोवीड काळात वेतन कराराची चर्चा थांबली. डिसेंबर 2020 पासून ही चर्चा पुन्हा सुरू झाली. कंपनीने गतवर्षी जानेवारीत चार हजार रुपये वेतनवाढ घोषित केली होती, पण आता ही वाढ एप्रिल 2021 पासून मिळेल असे सांगत दोन वर्षाची वाढ देण्यास नकार दिला आहे.

करार संपून दोन वर्षे झाली तरी अजूनही नवीन करार केला जात नाही. कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असतानाही कोरोनाचे नाव पुढे करत कंपनीकडून पगारवाढ देण्यास टाळाटाळ केली जात आहे. कंपनी व्यवस्थापनाने दिशाभूल करणे थांबवून नवीन वेतन कराराचा निर्णय 72 तासात घ्यावा अन्यथा कंपनीचे सगळे कामगार संपावर जातील असा इशारा यावेळी टायरवाले यांनी दिला. यासंदर्भात कामगार आयुक्त, जिल्हा पोलीस दलालाल निवेदन देण्यात येईल. आंदोलनादरम्यान होणार्‍या नुकसानीला व्यवस्थापन जबाबदार असेल असे यावेळी सांगण्यात आले.

बारामतीमध्येही पडसाद

इंडियन सिमलेस कंपनीतील सुमारे 150 कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. त्याच्या जागी कंत्राटी कामगार कायम करावे ही कामगार संघटनेची मागणी आहे. नगरला संप झाला तर त्याचे पडसाद बारामती अणि जेजुरी येथेही उमटतील. तेथील कामगारही संपावर जातील, त्यामुळे कंपनीने आंदोलन करायला न लावता नवीन वेतनकरार करावा अशी मागणी टायरवाले यांनी केली.

परप्रांतीयांच्या हाती दांडके

करोना लॉकडाऊन काळात पोलिसांचे दांडके खावून कामगार कंपनीत कामाला आले. मीटर ट्युबची विक्री दरमहा 350 टनाच्याही पुढे गेली. कंपनीची आर्थिक स्थिती सुधारली आहे, ऑर्डरही वाढली, पण कंपनी दिशाभूल करत आहे. परप्रांतीय सुरक्षा एजन्सीला बोलावून त्यांच्या हाती दांडके दिले. ते एजन्सीवाले दांडके हातात घेऊन कंपनीत फिरताहेत. कामगारांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढतो आहे. कंपनी एकीकडे चर्चा करते अन् दुसरीकडे पोलिसांकडे संघटनेविरोधात दहशतीची तक्रार करते. कामगार संघटना दोन वर्षे थांबली पण आता थांबणार नाही. वेतनकरार करा किंवा आंदोलनाला सामोरे जा अशी भूमिका कामगार संघटनेचे सचिव वसंत सिंग यांनी मांडली.

करोना या नैसर्गिक आपत्ती काळात प्रत्येक कामगाराने कंपनीला पंचवीस हजार रुपये दिले मदत दिली. माणुसकीच्या भावनेने ही मदत दिली. कंपनी बंद पडू नये ही काममगारांची इच्छा आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा हक्क मागतो, पण कंपनी व्यवस्थापन ते मानयाला तयार नाही, त्यामुळे नाईलाजास्तव आंदोलनाचा इशारा द्यावा लागला.

– बाबूशेठ टायरवाले

- Advertisment -

ताज्या बातम्या