Friday, May 29, 2026
Homeदेश विदेशStock Market News : युद्धाची झळ! भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण, ९...

Stock Market News : युद्धाची झळ! भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण, ९ लाख कोटी खाक

मुंबई । Mumbai

- Advertisement -

जागतिक राजकारणातील वाढत्या तणावाचा थेट आणि भीषण परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असून, आज बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’मध्ये मोठी घसरण झाली. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांना तब्बल ९ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

आज बुधवारी होळीच्या सुट्टीनंतर जेव्हा बाजार उघडला, तेव्हा सुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्समध्ये १७०० अंकांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स २ टक्क्यांहून अधिक घसरणीसह ७८,५२८.८२ अंकांच्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील ४८१.२० अंकांनी कोसळून २४,३८५.५० वर पोहोचला. युद्धाच्या सावटाखाली जागतिक बाजारपेठांमधील अस्थिरतेने भारतीय बाजाराचे कंबरडे मोडले आहे.

सेन्सेक्समधील ३० प्रमुख कंपन्यांपैकी २७ कंपन्यांचे शेअर्स आज लाल निशाण्यावर व्यवहार करत आहेत. यामध्ये ‘एल अँड टी’ (L&T) च्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांहून अधिक मोठी घसरण झाली आहे, तर ‘टाटा स्टील’चे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरले आहेत. विशेष म्हणजे, बाजारातील या पडझडीत केवळ इन्फोसिस, एचसीएल (HCL) आणि टीसीएस यांसारख्या मोजक्या आयटी कंपन्यांनी स्वतःला सावरले आहे, अन्यथा सर्वच क्षेत्रांत विक्रीचा दबाव दिसून येत आहे.

या घसरणीमागे केवळ युद्ध हेच एकमेव कारण नसून, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात आपले भांडवल काढून घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी देखील बाजारात अशाच प्रकारची स्थिती पाहायला मिळाली होती. त्यावेळी सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात २,७४३ अंकांनी कोसळला होता, तर निफ्टीमध्ये ५७५ अंकांची घट झाली होती. जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याने आशियाई आणि युरोपीय बाजारपेठांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आणि कच्च्या तेलाच्या दरात होणारी संभाव्य वाढ यामुळे भारतीय रुपयावरही दबाव येत आहे. गुंतवणूकदारांच्या भावनांवर या नकारात्मक बातम्यांचा खोलवर परिणाम झाला असून, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल वाढत आहे, तर शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे.

ताज्या बातम्या

Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचे रॅकेट उघड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील अहिल्यानगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या साई मिडास इमारतीमध्ये अँक्यूम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बुधवारी (27 मे) रात्री धाड टाकून सुरू...