Saturday, July 27, 2024
Homeअग्रलेखतेरे वजूद की, समय को भी तलाश हैं...

तेरे वजूद की, समय को भी तलाश हैं…

‘तू खुद की खोज मैं निकल,

तू किस लिये हताश है,

- Advertisement -

तू चल तेरे वजूद की,

समय को भी तलाश हैं।।’

गीतकार तन्वीर गाजी यांच्या गीतातील या भावना अंध महिला व पुरुष क्रिकेटपटू आणि त्यांच्या पालकांच्या मनात नक्कीच जागल्या असतील. इंटरनॅशनल ब्लाइंड स्पोर्ट्स फेडरेशनच्या जागतिक स्पर्धेत भारताच्या अंध महिला क्रिकेट संघाने नुकताच इतिहास रचला. या स्पर्धेत प्रथमच ‘टी-२० क्रिकेट’चा समावेश करण्यात आला. त्यात प्रथमच भारतीय महिलांचा संघ चॅम्पियन बनला. अंध पुरुषांच्या संघानेदेखील रौप्यपदक पटकावले. हा पराक्रम गाजवणे दोन्ही संघांसाठी सोपे नव्हते.

कारण त्यांचा संघर्ष फक्त मैदानापुरता मर्यादित नव्हता, नाही. नियतीने दृष्टीचे दान त्यांच्या पदरात टाकलेले नाही. त्याचे ओझे कदाचित त्यांना आयुष्यभर वाहावे लागेल, आयुष्यभर फक्त आंधळी कोशिंबीर खेळावी लागेल, असेही काहींना वाटले असेल. अशा विशेष मुलांच्या पालकांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नसावी. पावलोपावली मन निराशाग्रस्त होणे स्वाभाविकच! अंधत्वाला कोणताही भेद नाही. दृष्टी नसलेल्या व्यक्तीच्या वेदना आणि दुःख सारखेच असते. हे खरे असले तरी समाजरचना आणि सामाजिक असुरक्षिततेमुळे अंध मुलींच्या बाबतीत समस्या आणि भीतीची तीव्रता जास्त होते हेही नाकारता येणार नाही, पण या खेळाडूंनी हार मानली नाही. आव्हानांचा फक्त सामनाच केला नाही तर त्यावर यशस्वी मातसुद्धा केली. महिला संघाची कर्णधार सुषमा पटेल त्याचे चपखल उदाहरण! सुषमाने वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेतला. धनुष्यबाण खेळताना तिला अंधत्व आले. तेव्हा ती क्रिकेट खेळायची. दृष्टिहीननेनंतरही ती भावांच्या मदतीने खेळतच राहिली. वडिलांना शेतीत मदत करते.

जगज्जेतेपदाचा विक्रम करणाऱ्या संघाचे नेतृत्व तिने केले. सामाजिक देणगी आधारे अंध महिलांचा संघ बांधला गेला हे विशेष! शारीरिक कमतरता असणाऱ्या या मुलींना नव्हती का सामाजिक असुक्षिततेची भीती? पण त्यांनी त्यांच्यातील कमतरतांपेक्षा क्षमतांचा विचार केला. त्यावरच लक्ष केंद्रित केले. त्या क्षमतांचा अधिकाधिक विकास कसा होईल यावर भर दिला. क्षमतांची नुसती जाणीवदेखील प्रेरणादायक ठरते. पालकांचीही त्यांना साथ मिळाली. विशेष मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या मनात विश्वास जगवण्याचे काम त्यांच्या पालकांनी केले. विश्वासाच्या याच नात्याची सध्या मोठीच उणीव जाणवते. पालकांचा मुलांवर विश्वास नसल्याचेच आढळते. तोच अविश्वास मुलांची वाट कायमची चुकवू शकतो हे अधोरेखित करणाऱ्या अनेक घटना समाजात घडतात. अंध मुली आणि मुलांच्या पालकांनी सर्वच पालकांना एक धडा घालून दिला आहे. ‘कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती’ हेच त्यांनी स्पर्धा जिंकून सिद्ध केले आहे. विजयी भारतीय संघांचे अभिनंदन!

- Advertisment -

ताज्या बातम्या