Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधभारताचा डिजिटल स्ट्राईक

भारताचा डिजिटल स्ट्राईक

प्रत्यक्ष युद्धामध्ये भारताला पराभूत करणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानने भारताविरुद्ध प्रॉक्सी वॉर किंवा छद्म युद्ध पुकारले आहे. या छुप्या युद्धाचाच एक भाग म्हणून सायबर युद्धाचा पर्याय अवलंबला आहे. यूट्यूबसारख्या ऑनलाईन माध्यमावर चॅनेल्स तयार करून त्यावरून भारताची यथेच्छ बदनामी करणारे, इथल्या लोकभावना प्रक्षुब्ध करणारे, भारतातील अल्पसंख्याकांची डोकी भडकावणारे व्हिडिओ प्रसारित केले जात होते. अलीकडेच भारताने अशा 35 चॅनेल्सवर बंदी घातली असून संपूर्ण जगभरात ते आता दाखवले जाणार नाहीयेत. भारताचा हा डिजिटल स्ट्राईक स्वागतार्ह असला तरी या सायबर युद्धातला मुख्य खेळाडू चीन आहे, हे लक्षात ठेवावे लागेल.

पाकिस्तानने भारताविरुद्ध सुरू केलेल्या सायबर युद्धामध्ये भारताने डिजिटल स्ट्राईक करत पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. पाकिस्तान पुरस्कृत 35 यूट्यूुब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. हे सर्व चॅनेल्स पाकिस्तानमधून ऑपरेट केले जात होते. ‘नया पाकिस्तान’ या अम्ब्रेला ग्रुपअंतर्गत हे चॅनेल्स चालवले जात होते. विशेष म्हणजे या चॅनेल्सवर केवळ भारतातच बंदी घालण्यात आलेली नसून संपूर्ण जगभरात ही बंदी घातली गेली आहे. त्यामुळेच या सायबर युद्धामधील भारताच्या या यशाचे महत्त्व वेगळे आहे.

या यूट्यूब चॅनेल्सचे सबस्क्रायबर्स पाहिल्यास तो आकडा 35 लाख इतका आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चॅनेल्सवर भारताची बदनामी करणार्‍या व्हिडिओंच्या व्ह्यूजचा आकडा 130 कोटींच्या आसपास होता. यावरून या चॅनेल्सचा पसारा आणि व्यापकता किती प्रचंड मोठी होती हे लक्षात येते. भारताला बदनाम करण्यासाठी किती मोठे षडयंत्र रचले जात होते आणि त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळात होता, याचीही प्रचिती येते. त्यामुळेच भारताने उशिरा का होईना पण डिजिटल स्ट्राईक करत हे षडयंत्र मोडीत काढले आहे. अशा प्रकारचा डिजिटल स्ट्राईक भारताने प्रथम केलेला नाही. डिसेंबर 2021 मध्येही भारताने अशाच प्रकारच्या 20 यूट्यूब चॅनेल्सवर जगभरात बंदी आणली होती.

- Advertisement -

आता कुतूहलादाखल अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे की, या चॅनेल्सवर नेमके काय दाखवले जायचे? त्यावर कोणती माहिती दिली जायची? या चॅनेल्सवरून भारताविषयीची धादांत खोटी माहिती पसरवली जात होती. नुकत्याच बंद करण्यात आलेल्या 35 चॅनेल्समध्ये भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या अलीकडेच झालेल्या दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातास भारतच जबाबदार आहे, भारतात जातीय तेढ कशी निर्माण केली जाऊ शकते असे दिशाभूल करणारे, इथल्या शासन-प्रशासन यंत्रणेविरुद्ध जनभावनांना चिथावणी देणार्‍या व्हिडिओंचा समावेश होता. त्याचप्रमाणे काश्मीरसंदर्भातील अत्यंत स्फोटक व्हिडिओही त्यामध्ये होते. भारतीय लष्कराला बदनाम करणारे व्हिडिओ यामध्ये मोठ्या प्रमाणावर होते.

उत्तर कोरियाचे लष्कर भारतात येणार आहे अशी अप्रस्तुत आणि असंबद्ध माहिती देणार्‍या व्हिडिओंचाही त्यात समावेश होता. विशेष म्हणजे भारतातील अल्पसंख्याक समाजामध्ये काश्मीरच्या प्रश्नावरून चीड निर्माण करणारे, इथल्या लष्कराविषयी संताप निर्माण करणारे व्हिडिओ त्यामध्ये अधिक प्रमाणावर होते. भारताच्या परराष्ट्र धोरणावर कडाडून टीका आणि खोटी माहितीही या चॅनेल्सच्या माध्यमातून पसरवली जात होती. कृषी कायद्यांवरून भारतात प्रदीर्घ काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पातळीवरून हाताळले जात आहे, अशी माहितीही यातून दिली जात होती. थोडक्यात या सर्वांमागचा हेतू एकच होता तो म्हणजे जनतेत कमालीचा असंतोष पसरवणे! भारतात सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका होत असून ती वेळ साधून हे व्हिडिओ अधिक प्रमाणावर व्हायरल केले जात होते.

पाकिस्तानकडून असे प्रकार घडणे नवेही नाही आणि अनपेक्षितही नाही. प्रत्यक्ष युद्धामध्ये भारताला पराभूत करणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानने भारताविरुद्ध प्रॉक्सी वॉर किंवा छद्म युद्ध पुकारले आहे. या छुप्या युद्धाचाच एक भाग म्हणून या सायबर युद्धाकडे पाहावे लागेल. अलीकडील काळात विशेषतः 2014 नंतर एलओसीवर म्हणजेच भारत-पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताने गस्त वाढवली आहे. त्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना भारतात घुसणे आणि दहशतवादी हिंसाचार घडवून आणणे अवघड झाले आहे.

दुसरीकडे भारताचा आर्थिक विकास वेगाने होत आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढ चालला आहे. भारत विभागीय महासत्ता म्हणून पुढे येत आहे. अनेक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संस्था-संघटनांचा भारत सदस्य बनतो आहे. त्यापुढे जाऊन यातील अनेक संघटनांचा अजेंडा भारत ठरवू लागला आहे. अमेरिका, रशिया, इस्राईल, ऑस्ट्रेलिया आदी पाश्चिमात्य देशांबरोबरच इस्लामिक देशांशीही भारताचे घनिष्ट संबंध प्रस्थापित होत आहेत. भारताची ही घोडदौड पाकिस्तानला खुपते आहे. कारण भारताच्या विरुद्ध दिशेने पाकिस्तानचा प्रवास सुरू आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे. अशा स्थितीत जगाला आरोग्यसेवा देणारा पुरवठादार म्हणून भारताचा उदय होत आहे. करोनाकाळात हायड्रोक्सोक्लोरोक्वीन, मास्क, पीपीई किटस् भारताकडून पुरवले गेले.

करोना प्रतिबंधक 7.5 कोटी लसी भारताकडून गरीब आणि विकसनशील देशांना पुरवल्या गेल्या. तथापि पाकिस्तान मात्र फिनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये आहे. कोणतीही परकीय गुंतवणूक पाकिस्तानात येत नाहीये. भिकेकंगाल झालेल्या पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यास कोणी तयार नाहीये. तेथे महागाईने उच्चांक गाठला आहे. टोमॅटोचे दर किलोला 200 रुपयांपुढे गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी तेथे सोन्याचा दर एक लाख रुपये प्रतितोळ्यापर्यंत गेला होता. आपल्या या सर्व दयनीय, शोचनीय आणि रसातळाला गेलेल्या अवस्थेत भारताची प्रगती पाहून पाकिस्तानचा जळफळाट होत असून तोच या सर्व चॅनेल्सवरील व्हिडिओमधून प्रतिबिंबीत होताना दिसून येत आहे. भारताशी दोन हात करण्याची क्षमता पाकिस्तानकडे नसल्याने छुप्या मार्गांनी भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा देश करत आहे.

अर्थात, यामध्ये पाकिस्तान एकटाच आहे असे नाही. या सायबर युद्धातील मुख्य खेळाडू चीन आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. चीनने जगभरातल्या प्रसार माध्यमांत फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकी केलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अशा स्वरुपाची माहिती उघड झाली होती की, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल यांसारख्या अमेरिकेतील वर्तमानपत्रांना चीनकडून जाहिरातींच्या माध्यमातून असेल किंवा अन्य मार्गांनी भरघोस आर्थिक मदत दिली जात होती. त्याआधारे चीन भारतविरोधी बातम्या जाणीवपूर्वक छापून आणण्याचा प्रयत्न करत आहे. न्यूयॉर्क टाईम्ससारख्या वर्तमानपत्राला तर चीनने जणू भारताची बदनामी करण्याची सुपारी दिली आहे की काय अशी शंका येते. याच न्यूयॉर्क टाईम्सने करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान भारताची प्रतिमा मलिन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. हे सर्व चीन पुरस्कृत आहेत.

त्यामुळे भारताने पाकिस्तानवर जसा डिजिटल स्ट्राईक केला आहे तशीच उपाययोजना चीनविरोधीही करावी लागणार आहे. कारण चीन अशा प्रकारच्या सायबर वॉरफेअरमध्ये अत्यंत माहिर आहे. चीनकडून त्यांच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडवणारे आणि भारताला कमी लेखणारे तसेच भारताच्या भूभागांचा आपल्या हद्दीत समाविष्ट करणारे अनेक व्हिडिओ, छायाचित्रे, नकाशे प्रसारित केले जात असतात. त्यामुळे भारताला याबाबतही काही तरी पाऊल उचलावे लागणार आहे.

एक गोष्ट निश्चित आहे की, ताज्या डिजिटल स्ट्राईकमधून भारताचा वाढता प्रभाव दिसून आला आहे. गुगल, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब यांसारख्या माध्यमांमधून अनेक देशांच्या बदनामीचे व्हिडिओ, छायाचित्रे, माहिती प्रसारित होत असते. पण त्या सर्वांवर सर्व ठिकाणी बंदी घातली जातेच असे नाही. पण भारताने ज्या-ज्यावेळी या कंपन्यांकडे आक्षेप नोंदवले आहेत त्या-त्यावेळी या कंपन्यांनी तो कंटेंट काढून टाकण्याचे सौजन्य दाखवले आहे. यातून भारताचा प्रभाव लक्षात येतो. पण तरीही भारताने गाफिल राहून चालणार नाही. कारण अशा प्रकारच्या ग्लोबल प्रपोगोंडाचा परिणाम देशात येणार्‍या आर्थिक गुंतवणुकीवर होत असतो. त्यामुळे अशा बदनामीकारक, खोट्या, दिशाभूल करणार्‍या कंटेंटला वेळीच चाप लावण्याबाबत यापुढील काळातही दक्ष राहावे लागेल.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर,

परराष्ट्र धोरण विश्लेषक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या