प्रा.डॉ.वि.ल.धारूरकर
भारताची अर्थव्यवस्था जगभरात वेगाने वाढत आहे. गोल्डमॅन सॅक्सने तर 2075 मध्ये भारत 52.5 ट्रिलियन डॉलर्ससह दुसर्या स्थानावर विराजमान होईल, असे म्हटले आहे. कोविडोत्तर कालखंडात भारत जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनला आहे, ही बाब जगानेही मान्य केली आहे; परंतु त्या आधारावर थेट जगातील दुसर्या-तिसर्या स्थानापर्यंत भारत मजल मारू शकेल का?
कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, संरक्षण अशा राष्ट्रीय विकासाच्या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये दमदार वाटचाल केल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था आता नवी गरूडझेप घेण्याच्या अवस्थेत पोहोचली आहे. पायाभूत सुविधांचा विकास, कृषी क्षेत्रामध्ये शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहिलेली भक्कम पतयंत्रणा, उद्योग क्षेत्रासाठीच्या सुधारणा, लघु व मध्यम उद्योगांना दिलेले बळ आणि जीएसटीसारख्या आधुनिक करप्रणालीचा अवलंब यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी आली.
दरवर्षी होणारे चांगले पाऊसमान, शेतीमधील स्वयंपूर्णता, भाजीपाला, दूध उत्पादन आणि फळ उत्पादनामध्ये क्रांतिकारी उत्पादन यामुळे भारत जगाला अन्नधान्य, भाजीपाला आणि गव्हाचा पुरवठा तसेच सर्वप्रकारच्या खाद्यपदार्थांचा पुरवठा करत आहे. शिवाय ऊर्जा क्षेत्रामध्ये सौरऊर्जा, पवन ऊर्जा आणि विद्युत वाहनांना दिलेली चालना यामुळेही अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. रशिया आणि कॅनडासारख्या राष्ट्रांकडून मिळवलेल्या सवलतीच्या दरातील कच्चा तेलामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची अब्जावधी डॉलर्सची गंगाजळी सुरक्षित राहिली. निर्यातीच्या क्षेत्रात भारताने 400 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. युरोप, कॅनडा आणि आग्नेय आशियाई राष्ट्रे यांच्याबरोबर मुक्त व्यापार कराराच्या फेरी सुरू आहेत आणि त्या अंतिम स्वरुपात येत आहेत. भारताची नीती ही अधिक उदारमतवादी आणि सहिष्णू आहे. राष्ट्राला आर्थिक सहाय्य करून त्यांच्यावर राजकीय सार्वभौमत्व किंवा हुकमाची पाने गाजवण्याचा कोणताही प्रयत्न भारताने केलेला नाही. या निर्व्याजी सहकार्याची फळे म्हणजे नेहरू युगातील निष्क्रिय अलिप्ततेचे रूपांतर सक्रिय अलिप्तततावादात झाले आहे आणि त्यातून भारतीय अर्थकारणाला मोठी बैठक प्राप्त झाली आहे.
गोल्डमन सॅक्सने केलेल्या अभ्यासामध्ये तीन गोष्टींवर भर दिला आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारताकडे असलेली चाफ्यासारखी जिवंत प्रतिभाशक्ती. दुसरे म्हणजे नवकल्पना, सर्जनशीलता आणि यांच्या जोरावर विज्ञान-तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने घेतलेली गरूडझेप. भारताने आता सेमीकंडक्टर क्षेत्रामध्येसुद्धा चीनला आणि इतर देशांना मागे टाकून मोठा क्रमांक एकवर जाण्याचा संकल्प केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्रिटिकल इंजिनिअरिंग म्हणजे गंभीर अभियांत्रिकी या क्षेत्रामध्येसुद्धा भारताच्या इनोव्हेशन किंवा नव्या प्रज्ञाशोध कल्पनांना उत्तम गती देणारा आहे. पाहता पाहता स्टर्टअप क्षेत्रात भारत जगामध्ये दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताकडे येणारा परकीय गुंतवणुकीचा ओघ हा भारताची डॉलर गंगाजळी विक्रमी पातळीवर नेण्यात यशस्वी ठरला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये श्रमप्रधान अर्थव्यवस्था सर्वात जास्त आहे. भारतीय अर्थशास्त्रज्ञ शंतनू सेनगुप्ता यांच्या मते, वृद्ध लोकसंख्या आणि तरुणांची लोकसंख्या यांच्यामधील गुणोत्तर भारतामध्ये जेवढे चांगले आहे तेवढे जगातील कुठल्याही देशांमध्ये समतोल अवस्थेत नाही. तरुणांची लोकसंख्या ही उत्पादकता वाढवण्यासाठी अत्यंत पूरक ठरते. गोल्डमन कंपनीने म्हटले आहे की, भारतामधील लोकांचे श्रममूल्य वाढवण्यासाठी उत्पादनावर भर दिला पाहिजे. शिवाय महिलांचा औद्योगिक सहभाग वाढला पाहिजे. तथापि आपले सामर्थ्य मोठे आहे म्हणून पाठ थोपटून घेऊन समाधान मानण्यामध्ये अर्थ नाही. खरी गरज आहे ती कठोर आत्मपरीक्षण करण्याची. चिनी लोकांनी ज्या पद्धतीने अल्पदरामध्ये अधिक उत्पादने केली तशी आपणास उत्पादनक्रांती करावी लागेल. उपभोग्य वस्तूंच्या निर्मितीबरोबरच भारताची हुकूमत असलेली आयुर्वेदिक उत्पादने जगाच्या बाजारपेठेत पाठवली पाहिजेत. शिवाय खाद्यपदार्थांच्या बाबतीत, मनोरंजन उद्योगाच्या बाबतीत, ऊर्जा उद्योगाच्या बाबतीत आणि पर्यटन उद्योगाच्या बाबतीत आपणास मोठी झेप घ्यावी लागणार आहे.
नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या ‘इंडिया 2075’ या 114 पानांच्या अहवालामध्येसुद्धा विविध प्रकरणांची मांडणी करून पायाभूत सुविधांपासून रेल्वे, दळणवळण, विमानसेवा, सागरीसेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची दिशा दिली आहे. गरज आहे ती राजकीय शहाणपणाची. भारतामध्ये सत्तेच्या राजकारणासाठी इतके श्रमतास वायाला जातात की उत्पादक आणि श्रममूल्य निर्मितीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. जगामध्ये अर्थशक्तीला गवसणी घालणार्या पाच क्षेत्रांमध्ये पहिले क्षेत्र म्हणजे उत्पादक आणि उत्पादन व्यवस्था विकसित करणे. दुसरे म्हणजे सेवा क्षेत्र अधिक भक्कम करणे. तिसरी गोष्ट म्हणजे शेतीवर आधारलेल्या उद्योगांना प्रगत उद्योगाचे रूपांतर करून जगाच्या बाजारपेठा काबीज करणे. मध्यम व लघुउद्योगांद्वारे जागतिक उद्योगाशी स्पर्धा करणे. आपल्या शिक्षणाला राष्ट्रीय विकासाची बैठक प्राप्त करून देणे आणि जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये भारतातील 30 ते 40 विद्यापीठे जेव्हा येतील तेव्हा 2075 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये श्रेष्ठ ठरेल.
जागतिक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत भारत आज पाचव्या क्रमांकावर आहे. गोल्डमन कंपनीने असे म्हटले आहे की, भारत जेव्हा चीनशी स्पर्धा करू लागेल तेव्हा ब्राझील, मेक्सिको, युरोपिय राष्ट्रे मागे रेंगाळत असतील. परंतु भारताने हेही लक्षात ठेवले पाहिजे की, स्पर्धा चीनबरोबर आहे. चीनच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये सक्षम गोष्टी आहेत त्या सर्व क्षेत्रांमध्ये आपणास त्यापेक्षाही अधिकच्या गोष्टींचे संवर्धन करावे लागेल. भारतातील रुपयाला स्वातंत्र्याच्या वेळेचे डॉलर आणि रुपयाचे मूल्य आपणास प्राप्त करून द्यावयाचे असेल तर सध्या चालू असलेली रुपयातील व्यवहाराची कल्पना अधिक गतिमान केली पाहिजे. शिवाय चलन फुगवटा कमी केला पाहिजे. महागाईचा दर कमी केला पाहिजे. देशातील दुर्बल घटक, मागासवर्गीय, अनुसूचित जाती- जमाती, भटक्या जमाती, आदिवासी, महिला यांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेऊन त्यांच्या कल्याणाच्या अधिक मोठ्या योजना अंमलात आणल्या पाहिजे. असे झाले तर गोल्डमन कंपनीने जे सोनेरी स्वप्न दाखवले आहे ते सोनेरी स्वप्न खरोखर कृतीमध्ये येऊ शकेल.
‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडीया’ हे इकबाल यांचे गीत खरोखर कृतीमध्ये यावयाचे असेल आणि सुजलाम् सुफलाम् भारतभूमी ही खर्या अर्थाने आसेतू संपन्न आणि समृद्ध व्हावयाची असेल तर भगीरथ सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे. कारण हे स्वप्न सोने