संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा समृद्ध असून महिलांना सातत्याने सन्मान मिळतो आहे. महिलांच्या स्वयंरोजगारासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतील ‘इंदिरा महोत्सव’ हे मोठे व्यासपीठ ठरणार असून महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा हा महोत्सव असल्याचे गौरवोद्गार खासदार प्रणिती शिंदे यांनी काढले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावर एकविरा फाउंडेशन आयोजित अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून इंदिरा महोत्सव शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, आयोजक डॉ.जयश्री थोरात, शरयू देशमुख, प्रभावती घोगरे, लिज्जत पापडचे सुरेश कोते, कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, व्याख्याते गणेश शिंदे, केशव कांबळे, वंदना पाटील, मनीषा कटके, शरद नानापुरे, कुणाल दुसाने, अमित मनोरे, सतीश दवंगे, भावना बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेसने महिलांना आरक्षण दिले त्यामुळे महिलांना सर्वत्र काम करण्याची संधी मिळते आहे. तालुक्यातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालांना विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करून देण्याचे काम डॉ.जयश्री थोरात यांनी केले आहे. महिला मानसिक व सक्षमीकरणासाठी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यात काम होत आहे हा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी करून महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. मात्र आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, महिला, चिमुकल्या सुरक्षित नसल्याचे म्हटले. महिलांमध्ये समाज परिवर्तनाची सर्वात मोठी ताकद असून बचत गटाची मोठी चळवळ या तालुक्यात आहे. बचत गटातील महिलांसाठी विविध केंद्रीय योजना मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, असे खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले.
दूध व्यवसायामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी आपण सातत्याने काम करत असून गृह उद्योग, रोजगार, प्रशिक्षण याचबरोबर महिलांचे आरोग्य याकरिता या इंदिरा महोत्सवातून दोन दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ.जयश्री थोरात यांनी सांगितले. या महोत्सवात महिलांची नोंदणी करण्यात येत असून त्यांची आरोग्य तपासणी होत आहे. याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील 51 कंपन्या सहभागी झाले असून त्यातून अनेक महिलांना रोजगारासाठी करारबद्ध केले आहे. तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी हजर राहून महिलांना कर्ज प्रकरणाबाबत मार्गदर्शन करत आहेत.
महिला स्वयंपूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न : आ.थोरात
राजीव गांधी यांनी आरक्षण मांडले आणि त्यातून महिलांना विविध संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व मिळाले. बचत गटात अनेक महिला भगिनी असून त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत व्हावी यासाठी रोजगार -स्वयंरोजगाराची संधी देण्याची ही सुरुवात आहे. एक चांगला आदर्शवत आणि समृद्ध तालुका बनून संगमनेर तालुका देशाला दिशादर्शक ठरावा यासाठी आपण सर्वजण काम करूया अशा शुभेच्छा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन पद्धतीने मुंबईतून दिल्या.