Saturday, May 25, 2024
Homeनगरमनसेनंतर भाजप नेते तुषार भोसलेंची इंदोरीकर महाराजांशी बंद खोलीत चर्चा

मनसेनंतर भाजप नेते तुषार भोसलेंची इंदोरीकर महाराजांशी बंद खोलीत चर्चा

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

प्रसिध्द कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी संगमनेर येथील न्यायालयात फिर्याद दाखल झालेली असतानाच रविवारी मनसेचे नेते पानसे यांनी भेट घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे काल सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सुचनेनुसार भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी महाराजांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. महाराज यांच्या निवासस्थानी बंद खोलीतील चर्चा काय झाली याबाबत भोसले यांनी कुठलेही प्रतिक्रिया दिली नाही.

- Advertisement -

इंदोरीकर महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका खेड्यापाड्यात पोहचवली. त्यांनी आपल्या कीर्तनात ग्रंथाच्या आधारे वक्तव्य केलं. याप्रकरणी इंदोरीकर महाराजांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपायला हवा होता.

मात्र काही मुठभर लोकांनी कायद्याची पळवाट शोधत त्यांच्याविरोधात न्यायालयात फिर्याद दाखल केली, महाराष्ट्रातील अध्यात्मातील सर्व मंडळी महाराजांच्या पाठीशी आहेत, शिवसेना हिंदुत्ववादी होती. या चार-सहा महिन्यांत शिवसेनेचे हिंदुत्व कुठे दिसते, असा सवाल भाजपच्या आध्यात्मिक सेलचे सहसंयोजक तुषार भोसले यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे हे शरद पवार यांना सोडून इतर कुणालाही भेटायलाही तयार होत नाहीत. त्यामुळे आमच्या अडचणी राज्यपालांकडे मांडल्या आहेत. पुनश्च हरिओमच्या नावाखाली दारुच्या दुकानांसह सगळेच उद्योग सुरू केले. हरिला मात्र लॉक करून ठेवलं आहे, अशी टीका आचार्य तुषार भोसले यांनी केली.

महाराज ग्रंथातले वाक्य बोलले मात्र ते आजच्या कायद्याशी सुसंगत नाही, या वाक्याचे आम्ही समर्थन करत नाही, पण एखादे वाक्य चुकले, की ज्याची त्यांनी माफीही मागितली आहे. हा विषय माफीनाम्यानंतर संपायला हवा, आणि एक समज देण्यापर्यंत ठिक आहे. महाराष्ट्रातील एका चांगल्या कीर्तन परंपरेला,समाज प्रबोधन परंपरेला दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही श्री. भोसले यांनी दिला आहे.

भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबनराव मुठे यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. यावेळी ह,भ,प,शालिनिताई इंदोरीकर, किरण महाराज, नारायण महाराज, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, काकड, भिकचंद मुठे, आकाश त्रिपाठी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या