Friday, November 22, 2024
Homeनगरऔद्योगिक विकास महामंडळाचे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय जिल्ह्यात सुरू

औद्योगिक विकास महामंडळाचे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय जिल्ह्यात सुरू

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

अहिल्यानगरच्या औद्योगिक विकासातील अडथळे दूर करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे औद्योगिक विकास महामंडळाचे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय जिल्ह्यात सुरू झाले आहे. या कार्यालयामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला असून, नवीन उद्योगांना तसेच उद्योगाशी संबंधित लागणारे सर्व परवाने आता जिल्ह्यातच मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील उद्योजकांना विविध कामांसाठी थेट नाशिक येथे प्रादेशिक कार्यालयात जावे लागत होते. त्यातच वेळेत काम न झाल्यास नाशिक येथे प्रादेशिक कार्यालयात उद्योजकांना हेलपाटे मारणे त्रासदायकही झाले होते. जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा तयार करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न जाणून घेतले. यामध्ये प्रामुख्याने प्रादेशिक कार्यालयाची मोठी समस्या समोर आली होती. उद्योजकांच्या मागणीची दखल घेऊन मंत्री विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथेच औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय सुरू करण्याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता.

राज्य सरकारने आता अहिल्यानगर येथील प्रादेशिक कार्यालयास मंजुरी दिल्याने हे कार्यालय आता सुरुही झाल्याने जिल्ह्यातील नागापूर, सुपा, श्रीरामपूर, पांढरीपूल या चार औद्योगिक वसाहतीं बरोबरच आता नव्याने विकसीत होत असलेल्या शिर्डी आणि श्रीगोंदा येथील नव्या औद्योगिक वसाहतीमध्ये येणार्‍या उद्योजकांनाही विविध परवानग्यांसाठी या नव्या कार्यालयांचा मोठा आधार मिळणार आहे. नव्याने सुरू झालेल्या या कार्यालयात प्रादेशिक अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची नियुक्तीही करण्यात आली असून, या कार्यालयामुळे आता नाशिक येथे जाण्याचा उद्योजकांचा त्रास वाचला आहे.

जिल्ह्याच्या औद्योगिक विस्तारासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय जिल्ह्यातच असावे ही उद्योजकांची मागणी कार्यालय सुरु झाल्याने पूर्ण झाली असून, याचा लाभ औद्योगिक वसाहती मधील उद्योजकांना आणि नव्याने येणार्‍या उद्योजकांना निश्चितच होईल.
– पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या