अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एमआयडीसीतील प्लॉट नंबर बी 88 मधील नॉर्दन लाईट कंपनीमधून स्टिलचे नट बोल्ट आणि इलेक्ट्रिक मोटार असा तीन लाख 80 हजार रुपयांचा ऐवज दोघांनी चोरून नेला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (29 मार्च) रात्री चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मनदीप विजय सॅम्बी (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे.
आशिष होळकर, मोहीत पप्पू निशाद (रा. निंबळक ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सदरची घटना 14 मार्च ते 27 मार्च दरम्यान घडली आहे. संशयित दोघा आरोपींनी फिर्यादीच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीन लाख रुपये किमतीच्या स्टेनलेस स्टीलचे नट-बोल्ट असलेल्या 70 गोण्या, 80 हजार रुपये किमतीची 5 एच.पी. क्षमतेची इलेक्ट्रिक मोटार असा एकूण तीन लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
ही घटना 27 मार्च रोजी उघडकीस आली. फिर्यादी यांनी 29 मार्च रात्री 11 वाजता एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघा संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करीत आहेत.