पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
राज्यात कृषी क्षेत्राशी निगडीत उद्योगांना चालना मिळावी म्हणून राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. मात्र याच महामंडळाने त्यांच्या ताब्यात असलेल्या पर्यायी उद्योगाच्या जागेत उद्योग सुरु करण्याऐवजी चक्क खरीप शेतीचा प्रयोग सुरु केल्यामुळे पुणतांबेकरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेमके यामागे काय गौडबंगाल आहे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पोलखोल करणार आहे, असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुहास वहाडणे यांनी दिला आहे.
पुणतांबा येथील चांगदेव कारखाना 1984 मध्ये बंद पडल्यानंतर तसेच शेती महामंडळाच्या चांगदेवनगर ऊस मळ्यावरील खंडकरी शेतकर्यांच्या जमिनी परत केल्यानंतर या परिसरातील अंदाजे 1000 जणांचा रोजगार जाऊन ते बेकार झाले. त्यामुळे परिसरात रोजगाराभिमुख एखादा पर्यायी उद्योग सुरु करावा, अशी पुणतांबेकरांनी सातत्याने मागणी लावून धरली होती.
या मागणीची दखल घेऊन तात्कालिक कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2014 मध्ये येथील कोपरगाव रोडलगत 10 एकर जागेत 38 कोटी रुपये खर्चाच्या खत प्रकल्पाचे अनेक मान्यवराच्या हस्ते भूमिपूजन केले होते. यासाठी येथील कृषी विद्यालयाच्या मालकीची 10 एकर जागा राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आली होती. मात्र या पर्यायी उद्योगाचे भूमिपूजन झाल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका होऊन त्यात सत्तांतर झाले. त्यामुळे या उद्योगाला चालना मिळाली नाही.
दरम्यान या पर्यायी उद्योगाच्या जागेला 9 लाख रुपये खर्च करून संरक्षक भिंत बांधण्यात आलेली होती. गेल्या 9 वर्षापासून या जागेत कोणताही पर्यायी उद्योग आमदार, खासदार, मंत्री तसेच कृषी उद्योग विकास महामंडळाला सुरु करता आला नाही हे व्यवस्थेचे अपयश व पुणतांबेकरांचे दुर्देव आहे. आता मात्र या जागेत मका, सोयाबीन या खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. उद्योगाच्या जागेत पिकांची पेरणी करणे हे कृषी उद्योग विकास मंहामडळाच्या उद्देशाचा भाग असू शकत नाही. महामंडळाच्या संचालक मंडळ व व्यवस्थापकांनी उद्योग मंत्र्यांना विश्वासात घेऊन असा निर्णय घेतला का ? अशी शंका येत आहे. किंबहुना अधिकारी वर्ग या निर्णयाप्रत का आले नेमकी काय वस्तुस्थिती आहे याची पुणतांबेकरांना माहिती होणे गरजेचे आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून उद्धव ठाकरे यांना भेटून वस्तुस्थिती पुणतांबेकरांसमोर आणणार असल्याचे श्री. वहाडणे यांनी म्हटले आहे.