मुंबई | Mumbai
टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर थरारक विजय मिळवला. संजू सॅमसनची ८९ धावांची तुफानी खेळी आणि अखेरच्या षटकांत हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराहच्या अचूक गोलंदाजीमुळे सामना भारताच्या बाजूने फिरला. मात्र या सर्वांबरोबरच इंग्लंडविरुद्ध पुन्हा एकदा ‘बापू’ अक्षर पटेल मैदानावर हिरो ठरला. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेथल आणि जॅक्स जोडी घातक ठरत होती, तेव्हा सीमारेषेवर अक्षर पटेलच्या चपळाईमुळे भारतीय संघाला जॅक्सला बाद करता आलं. अक्षय पटेलच्या कॅचची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. उत्कृष्ठ फिल्डिंग आणि गोलंदाजीने त्याने टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून वाचवले.
एकीकडे इंग्लंडच्या खेळाडूंकडून सोपे झेल सुटले, तर दुसरीकडे अक्षर पटेलने असे काही झेल टिपले जे पाहून सर्वांच्याच काळजाचे ठोके चुकत होते. अक्षर पटेलने उलट्या दिशेने धावत जाऊन हॅरी ब्रुकचा भन्नाट झेल घेतला. हा झेल पाहून सर्वांनाच भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची आठवण झाली असावी. हा सामना पाहण्यासाठी रोहित शर्मा, एमएस धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. अक्षरने घेतलेला हा झेल पाहू सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण हा झेल सोपा वाटत असला तरी तेवढा सोपा नव्हता.
नेमके काय झाले तेव्हा
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने सुरूवातीपासूनच आक्रमक सुरवात केली. चौथे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या १ गडी बाद ३८ धावा होती. हॅरी ब्रुक स्ट्राईकवर असताना बुमराह गोलंदाजी करण्यासाठी आला. बुमराहच्या गोलंदाजीवर ब्रुकने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या अक्षर पटेलने मागच्या दिशेने धावत जाऊन भन्नाट झेल घेतला. हा झेल पकडताच, संपूर्ण स्टेडियममध्ये एकज जल्लोष करण्यात आला.
विल जॅक्सचा थरारक झेल
इंग्लंडचा फलंदाज जेकॉब बेथल आणि विल जॅक्स जोडी या जोडीमुळे वानखेडेच्या स्टेडियमवर काही काळ शांतता पसरली होती. या जोडीच्या जोरावर इंग्लंडचा संघ सामन्यात भक्कम परिस्थितीत पोहचण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. पण अक्षर पटेलने सीमारेषेवर डोळ्याचे पारण फेडणारा क्षेत्ररक्षणाचा नजाराणा दाखवून देत ही जोडी फोडली. अर्शदीपच्या गोलंदाजीवर विल जॅक्सने खेळलेला मोठा फटका अक्षरने अप्रतिमरित्या झेल घेतला. एवढेच नव्हे शिवम दुबेन रॅली कॅच पूर्ण केला अन् वानखेडेवर एकच जल्लोष पाहायला मिळाला. जेकब बेथल आणि विल जॅक्स या जोडीने पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली. ही जोडी आणखी काही काळ टिकली असती तर सामना भारताच्या हातून निसटला असता. पण कमालीच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामन्यात ट्विस्ट आले. अक्षर पटेलने मिळवून दिलेली ही विकेट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली.




